‘बलात्कार शांततेत पार पडला’ म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्यच, संजय राऊत यांनी फटकारले; गुडांच्या ओळख परेडवरून पोलिसांनाही सुनावलं

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार अद्यापही मोकाट आहे, असे ते म्हणाले. तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलीस आयुक्तांनी ओळख परेड केलेले गुंड भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सक्रिय होते, असा आरोपही त्यांनी केला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानाचाही समाचार घेतला.

सार्वजनिक परिवहन खात्याच्या बस स्थानकामध्ये थांबलेल्या गाडीमध्ये बलात्कार होतो आणि आपले गृह राज्यमंत्री म्हणतात की प्रतिकार झाला नाही, बलात्कार शांततेत पार पडला त्यामुळे बाहेर काही कळाले नाही. एका अबलेवर गाडीमध्ये गळा, तोंड दाबून बलात्कार होतो आणि तिने ‘स्ट्रगल’ केला नाही, त्यामुळे आम्हाला बाहेर काही कळले नाही हे या गृह राज्यमंत्र्यांचे शब्द आहेत. स्ट्रगल म्हणजे तिने काय करायला पाहिजे होते? असा खडा प्रश्न उपस्थित करत आपले गृह राज्यमंत्री दिव्यच आहेत, असा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांना लोक दादा म्हणतात. त्यांच्या राज्यात या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक, पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलीस, कायद्याला आम्ही कशाही प्रकारे मॅनेज करू शकतो आणि न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा आत्मविश्वास गुंडांमध्ये आहे. याच्यातून राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार मोकाट सुटतात, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गुन्हेगारांना कोणताही राजकीय पक्ष नसतो. कुणाच्याही व्यासपीठावर जाऊन ते फोटो काढतात आणि रुबाब गाजवतात. अशा गुन्हेगारांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत ही विकृती वाढत जाईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन कसे केले जात होते, हा इतिहास राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे. तसेच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावेळी विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाले. आता निवडणुका नाहीत, असेही ते एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.

पुण्यात काही दिवसांपूर्वी ओळख परेड झालेल्या सगळ्या गुंडांनी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलेले आहे. त्या काळात त्यांना मोकळीक होती. पोलीस आयुक्तांनी परेड केलेले हे सगळए गुंड भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. त्यावेळी त्यांची ओळख परेड आणि धिंड का काढली नाही? असा सवाल राऊत यांनी केला.