Pune rape case – नराधम दत्तात्रय गाडे याला अखेर अटक, कुठे लपून बसला होता?

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमधील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय रामदास गाडे (वय – 35) असे आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर आरोपी गुणाट या गावी पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 13 पथके रवाना केली. पोलिसांसह गावकरीही आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपये बक्षीस ठेवले होते.

गुणाट गावात आणि आजूबाजूच्या भागांमध्ये त्याचा शोध सुरू होता. गावातील उसाच्या शेतामध्ये आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गावात 100 ते 150 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

आरोपीच्या शोधासाठी ड्रोनची मदत घेतली जात होती. दिवसभर त्याचा शोध सुरू होता. मात्र रात्रीपर्यंत तो पोलीस आणि गावकऱ्यांना चकवा देत होता. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास एका उसाच्या शेतातून गेलेल्या कॅनॉलमध्ये लपून बसलेल्या दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

अटकेनंतर पुणे पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन पुण्याला रवाना झाले. सध्या आरोपीला लष्कर पोलीस स्थानकातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. आजच त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला सकाळी 11 वाजता न्यायालयासमोर हजर केले जाईल.