गणेशोत्सवात मराठी कार्यक्रमांनाच प्राधान्य द्या! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन 

मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मराठी कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.

मराठी भाषा गौरव दिन आज देश-परदेशात साजरा केला जात आहे, मात्र जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांपैकी पहिल्या 15 मध्ये असलेल्या मराठीची जेवढी भरभराट व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी मंडळाच्या वतीने वर्षभर जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यात मराठी कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात यावे. विशेष म्हणजे आगामी भाद्रपदमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात 100 टक्के मराठी भाषेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले.

मराठी सण धूमधडाक्यात साजरे करा!

मंडपात मराठी सुगम संगीत, भावगीत तसेच मराठी लोककला, नाटके आयोजित करणे आवश्यक आहे. समितीने सांस्कृतिक मंत्र्यांना दहा दिवसांपैकी तीन दिवस मराठी नाटके, पोवाडे असे सांस्कृतिक कार्यक्रम सरकारच्या वतीने मोफत देण्याची विनंती केली आहे.