होळीआधीच चटके! पारा 40 अंश सेल्सिअसवर

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः काहिली होत आहे. यातच पाऱयाने अनेक भागांत 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाचे चटके बसत आहेत. ही स्थिती अजून काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केल्यामुळे मार्चमध्येही उन्हाचा ताप सहन करावा लागणार असल्याचा इशारा दिल्याने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.

दरवर्षी होळीपासून उकाडा वाढण्यास सुरुवात होते, मात्र या वर्षी होळीआधीच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत नोंद होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातही पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. प्रखर उन्हामुळे या भागातील जलसाठय़ांमधील पाण्याच्या बाष्पीभवन वाढले असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबईकरांना ‘ताप’

मुंबईत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसवर गेले असून तापमान अजून काही दिवस 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

यानुसार पुढील 48 तासांत आकाश निरभ्र राहणार असले तरी हवामान उष्ण-दमटच राहणार असल्याचे मुंबई हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

…म्हणूनच वाढला उकाडा

पूर्वेकडून येणाऱया वेगवान वाऱयांनी समुद्री वाऱयांचा वेग रोखल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. उकाडय़ामुळे मुंबईच्या प्रदूषणातही वाढ झाली असून श्वसनाचे आणि घशासंबंधीचे आजार होत आहेत.