
स्थानिकांचा विरोध झुगारून अदानीमार्फत धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यातच आता धारावीचा मास्टर प्लॅन येत्या महिनाभरात सादर होणार आहे, अशी माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी आज दिली.
धारावीचा पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि अदानीच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास 84 हजार झोपड्यांना नंबरिंग झाले असून 54 हजार झोपडय़ांचे डोअर टू डोअर सर्वेक्षण झाले आहे. पात्र रहिवाशांना धारावीतच, तर अपात्र रहिवाशांना धारावीपासून 10 किमी अंतराच्या क्षेत्रात भाडेतत्त्वावर घरे दिली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 10 कोटी चौरस फुटांवर धारावीकरांचे पुर्नवसन केले जाणार आहे तर 14 कोटी चौरस फुटांपर्यंत जागेचा विकास करून त्याच्या विक्रीचे अधिकार अदानीच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहेत. धारावीत धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी डीआरपीने उच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमली असून त्यामध्ये गृहनिर्माण विभाग, नगरविकास विभाग, उपजिल्हाधिकारी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.