
वैयक्तिक वादातून सहकाऱ्याची हत्या करून पळून गेलेल्या वेटरला वनराई पोलिसांनी अटक केली. रघू ऊर्फ राजू गौडा असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी देवराज गौडाला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गोरेगाव पूर्व एक येथे बार आहे. एका बारमध्ये काम बंद झाल्यावर रघू हा मालाड येथील दुसऱ्या बारमध्ये गेला होता. तेथे बारच्या मालकाने रघूला बारच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत राहण्यास परवानगी दिली, तर देवराज गौडा हादेखील एका बारमध्ये काम करायचा. त्यालादेखील मालाड येथील एका बारमध्ये नोकरी मिळाली होती. ती खोली रघू जेथे काम करत होता, त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाची होती. रघु हा आपल्याला कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो असे देवराजला वाटत असायचे. त्यावरून त्याच्यात नाराजी होती. घटनेच्या दिवशी रघू हा झोपला होता.
तेव्हा तेथे देवराज आला. त्याने अचानक रघूवर रॉडने हल्ला केला. बारच्या तळमजल्यावर राहणाऱ्या एका वेटरला हा प्रकार समजला. तो पहिल्या मजल्यावर गेला. त्याने गंभीर जखमी झालेल्या रघूला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी रघूचा जबाब नोंदवला. रघूच्या हत्येप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी पथक तयार केला. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण तुपारे, उपनिरीक्षक राहुल देवडे, उपनिरीक्षक रंजित वणवे, वाघमोडे, तळेकर, मिसाळ आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक माहीम येथे गेले. माहीम रेतीबंदर येथून देवराजला ताब्यात घेऊन अटक केली.