
बुधवारी अफगाणिस्तानच्या लढवय्या खेळाडूंनी शेवटपर्यंत संघर्ष करत इंग्लिश संघाचे काम तमाम केले. आता ऑस्ट्रेलियावरही अफगाणी हल्ल्याची भीती आहे. ऑस्ट्रेलियाला धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारण्याचे ध्येय अफगाणिस्तानने आपल्यापुढे ठेवले आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई असेल. जो जिंकेल तोच सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठेल. अफगाणिस्तान हरला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलिया हरली तर त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या मोठय़ा पराभवासाठी देवाचा धावा करावा लागेल.
अफगाणिस्तानने बलाढय़ इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवून आम्हाला ‘डार्क हॉर्स’ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघही अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. आधीच ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसात वाहून गेल्याने उभय संघांना 1-1 गुण विभागून देण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका विजयासह आता 3 गुण आहेत. इंग्लंडवरील विजयाने अफगाणिस्तानचेही मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी उद्याची लढाई तशी सोपी नसेल.
ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, पण…
ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान संघांमध्ये आतापर्यंत चार एकदिवसीय सामने झाले आहेत. या चारही सामन्यांत ऑस्ट्रेलियानेच बाजी मारलेली आहे, मात्र 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चांगलेच झुंजविले होते. त्यावेळी मॅक्सवेलच्या द्विशतकी खेळीने वाचविले होते.
उभय संघ – अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, इब्राहिम झदरान, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह ओमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, फजलहक फारूकी, नूर अहमद. n ऑस्ट्रेलिया ः स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, ऍलेक्स कॅरी, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऍरोन हार्डी, ट्रव्हिस हेड, जॉश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, मॅथ्यू शॉर्ट, ऍडम झम्पा.