
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुरुवारी तपास यंत्रणांनी तब्बल 1400 पानांचे आरोपपत्र मकोका न्यायालयात दाखल केले. यात अॅट्रॉसिटी, खंडणी तसेच हत्या प्रकरणाचा समावेश आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे जीवश्चकंठश्च वाल्मीक कराडसह आठ जण या प्रकरणात आरोपी आहेत.
मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अवादा कंपनीकडे कराड गँगने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच वादातून कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. सुरक्षा रक्षकाला वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर देशमुख यांचे अपहरण करून 9 डिसेंबर रोजी त्यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सूर्यवंशी या आठ जणांसह फरार असलेल्या कृष्णा आंधळेला ‘मकोका’ लावण्यात आला आहे.
एसआयटी, सीआयडी, न्यायालयीन समिती अशा विविध माध्यमांतून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. आज तपास यंत्रणांनी तब्बल 1400 पानांचे आरोपपत्र मकोका न्यायालयात सादर केले. या वेळी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली, सीआयडीचे प्रमुख किरण पाटील न्यायालयात उपस्थित होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि अॅट्रॉसिटी अशा तीन वेगवेगळय़ा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर 80 दिवसांतच तपास पूर्ण करून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपपत्र स्वीकारल्यानंतर ते आरोपींना तसेच सरकारी वकिलांना वाचण्यास देण्यात येईल. त्यानंतर खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खटला लढवणार आहेत.
आरोपींना सोडवण्यासाठीच हजारो पानांचे आरोपपत्र : प्रकाश आंबेडकर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी दीड ते दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. एवढे मोठे कागदपत्र वाचण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांना वेळ नाही. केवळ आरोपींना सोडवण्यासाठीच हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आरोपपत्रात काय आहे…
- वाल्मीक कराडचा हत्या, खंडणी प्रकरणातील सहभाग
- संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि त्याचे पुरावे संतोष देशमुख यांच्या हत्येचे मूळ कारण
- विष्णू चाटे याचा कटातील सहभाग
- आरोपींना मदत करणारांचा पर्दाफाश
- संतोष देशमुखांची हत्या करताना वापरलेले शस्त्र
- पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली बेइमानी