
>> साधना गोरे, [email protected]
आपल्या आईवर प्रेम नसणारा माणूस जगात विरळाच! ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही कवी यशवंत यांची कविता असो किंवा ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं !’, ‘आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही!’ या फ. मुं. शिंदेंच्या कवितेतील ओळी असोत, त्यामध्ये सांगितलेली आईची थोरवी प्रत्येकाने अनुभवलेली असते. जगातल्या अनेक कवी, लेखकांनी आईचं प्रेम, ममत्व याबद्दल भरभरून लिहिलं आहे. प्रत्येक मुलाला आपल्या आईविषयी जैविक प्रेम असतंच. तसं जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये, भाषांमध्ये जन्मदात्रीला उद्देशून वापरल्या जाणाऱ्या संबोधनांमध्ये कमालीचं साम्य आहे.
तर मराठीतला हा ‘आई’ शब्द कुठून आला? आणखी कोणत्या भाषांमध्ये तो वापरला जातो? याबद्दलची माहिती घेऊच, पण त्याआधी ‘माय’, ‘माई’ या शब्दांविषयी पाहू. ‘माई’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘माता’ शब्दामध्ये आहे. ‘माता’ हा इंडो-युरोपियन भाषा कुळातील सर्वात जुन्या शब्दांपैकी एक आहे. संस्कृतमध्ये ‘मातृ’, अवेस्तामध्ये ‘मातर’, फार्सी-उर्दूमध्ये ‘मादर’, ग्रीकमध्ये ‘METER’, लॅटिनमध्ये ‘MATER’, जर्मनमध्ये ‘MUOTAR’, स्लावमध्ये ‘MATI’, डचमध्ये ‘MOEDER’ आणि इंग्रजीमध्ये ‘MOTHER’ अशी त्याची रूपं पाहायला मिळतात. मुस्लिम समाजामध्ये आईसाठी वापरले जाणारे ‘अम्मी’ किंवा इंग्रजीतील ‘मॉम’ किंवा ‘मम्मी’ ही संबोधनंसुद्धा याच साखळीतली आहेत.
मराठीसहित अनेक भारतीय भाषांमध्येही ‘माई’शी मिळतीजुळती अनेक रूपं दिसतात. हिंदीमध्ये ‘माँ’, तर गुजरातीमध्ये ‘मा’ म्हटलं जातं. तामीळ, तेलुगू आणि मल्याळी या द्राविडी भाषांमध्ये आईला ‘अम्मा’ म्हणतात. प्राकृत भाषांमध्ये सर्वात प्राचीन असलेल्या पालीमध्येही ‘अम्मा’ शब्द आहे. शिवाय तेलुगूमध्ये आईच्या आईला ‘अम्मयू’, ‘अम्मसी’, ‘अम्माअत्ता’ असे शब्द आहेत; तर वडिलांच्या आईला ‘अम्माम्मी’ म्हटलं जातं. कन्नडमध्ये ‘अम्ब’ किंवा ‘अम्बे’ असा शब्द आहे.
विविध भाषांमध्ये ‘माता’ शब्दाला पर्यायवाची असलेल्या शब्दांमध्ये ‘मा’ अक्षर आहे. त्यावरून काही भाषा वैज्ञानिक या शब्दांच्या मागे ‘मा’ हा धातू म्हणजे मूळ शब्द असल्याचं सांगतात, तर काही भाषा वैज्ञानिक ‘म’ वर्णावरून तयार झालेला हा पालक (nursery) शब्द मानतात. ध्वनी अनुकरणाने हा शब्द सगळीकडे वापरला जाऊ लागला असं मानलं जातं. यासंदर्भात एक मजेशीर, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही ताह्या मुलांच्या तोंडून सहज, विनासायास जे ध्वनी बाहेर पडतात, ते कधी लक्षपूर्वक ऐकलेत का? ‘अम्’, ‘मम्’, ‘हुम्म’ असे ध्वनी तान्हुल्यांच्या दात नसलेल्या मुखातून ऐकायला येतात. स्तनपान करतानाही तान्ह्या मुलांच्या तोंडून हे आवाज निघतात. त्यामुळे मूल रडलं नाही, पण त्याने ‘अम्’, ‘मम्’ असा आवाज काढला तरी तो त्याला भूक लागल्याचा संकेत समजला जातो. त्यामुळेच इंग्रजीमध्ये सस्तन प्राण्यांसाठी ‘mammal’ (मॅमल) हा शब्द वापरला जात असावा. हा शब्द लॅटिनमधील ‘मम्मा’ (mamma) शब्दावरून आला. लॅटिनमध्ये ‘मम्मा’ म्हणजे स्तन. तामीळमध्येही मातेच्या स्तनाला आणि बाळाच्या अन्नाला ‘अम्मम्’ असा शब्द आहे. आईचं दूध हेच तान्हुल्याचं पूर्ण अन्न असतं. त्यामुळे त्या अन्नाला आणि ते अन्न देणारीलाही एकाच साखळीतले शब्द वापरले गेले याचं नवल वाटत नाही. नवल वाटतं ते याचं की, किती विभिन्न संस्कृतींतील भाषिकांनी हे शब्द वापरले आहेत.
आता मराठीतील ‘आई’ शब्दाकडे वळू. ‘आई’ शब्दही इंडो-युरोपियन भाषा कुळातील आहे. त्यामुळे तो ग्रीक आणि लॅटिनमध्येही (Ai) आहे, परंतु संस्कृतमध्ये आईशी साम्य असणारा तंतोतंत शब्द आढळत नाही. याविषयी व्युत्पत्तिकोशकार कृ. पां. कुलकर्णी ‘आर्ये’, ‘अयि’, ‘आदि’ असे मूळ संस्कृत शब्द व्युत्पत्ती म्हणून देतात, परंतु त्याने समाधान होत नाही. प्राकृतमध्ये ‘आइ’ असा शब्द आहे. हा शब्द देशी असावा. कोकणात ‘आइस’ हा शब्द त्याच अर्थी वापरात आहे. यामधील ‘स’ हा संस्कृतमधील ‘श्री’चा अपभ्रंश असावा. यादव काळात त्याचे ‘आउस’ झाले आणि मग ‘आई’ झाले.’
थोडक्यात, आई, माई या अर्थाचे शब्द जगभरातल्या भाषांमध्ये सारखेच दिसतात. भाषाभाषांमधील या साम्याने आपण चकित, आनंदित होतो. भाषा-संस्कृतींमधील हे साहचर्य असेच वाढत राहो आणि सोबत त्यांचे स्वतंत्र अस्तित्वही अबाधित राहो!