
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 76 दिवस उलटले असून अद्यापही कृष्णा आंधळे हा फरार आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी देशमुख कुटुंब आणि संपूर्ण मस्साजोग गावाने अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. जे आता तात्पुरती स्थगित करण्यात आलं आहे.
देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सरकारकडे सहा मागण्या केल्या होत्या. मात्र त्यातली फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी पूर्ण झाली आहे. पात्र अद्यापही पाच मागण्या या अपूर्ण आहेत. या मागण्याही लवकर पूर्ण होतील, अशी अशा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले आहेत की, ”दोन दिवस सुरु असलेलं अन्नत्याग उपोषण आज सुटलं. गावकऱ्यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. त्यात आम्ही कुटुंबीय सहभागी झालो होतो. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या वतीने पाच ते सहा दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं आहे.”