महायुतीत चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

महायुती सरकारमध्ये मंत्र्यांचे पीए आणि ओएसडीच्या नियुक्त्यांवर वाद रंगला असताना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा कायम आहे. अशातच नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे.

एकनाथ शिंदे यांनी याआधी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास आणि अर्थ विभगाचे सचिव उपस्थित होते. यासोबतच रेल्वेचे मुख्य अधिकारीही उपस्थित होते. पण बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्पात घोटाळे झाल्याचे आरोप होत आहेत. याच्या चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं आहे की, ”निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) दम दिला की, आता तुमच्या कोणाच्याही जाण्यामुळे सरकारवर परिणाम होणार नाही. आमचे पीएस आणि ओएसडी हे देखील मुख्यमंत्री ठरवतात.” यावर फडणवीस यांनी त्यांना चांगलाच दम देत म्हटलं होतं की, ”मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून आणि चुकीच्या कामात पुढे आली आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही.”