Mumbai Local Train – फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा ‘थंडगार झटका’, 1.72 कोटींची दंडवसुली

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल होणाऱ्या दंडात लक्षणीय वाढ झाली आहे.

51,600 हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय विभागात दररोज 109 एसी लोकल सेवा चालवल्या जातात. ज्यातून अंदाजे 1.26 लाख प्रवासी प्रवास करतात. चालू आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये (जानेवारी 2025 पर्यंत) मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या 51,600 हून अधिक प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1.72 कोटी रुपये दंड वसूल केला.

यातच फक्त जानेवारी 2025 मध्येच पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6,258 प्रवाशांवर कारवाई करत 20.97 लाख रुपये दंड वसूल केला करण्यात आला. जो जानेवारी 2024 च्या तुलनेत 31 टक्के वाढ जास्त आहे.

पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुधारण्यासाठी आणि तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी, पश्चिम रेल्वेने अनेक प्रमुख उपक्रम राबवले आहेत. ज्यात उपनगरीय लोकल्समधील विनातिकीट प्रवासकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष एसी टास्क फोर्स बनवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रवासी एसी लोकल ट्रेनबाबत कोणतीही तक्रार असल्यास 24×7 तक्रारी हेल्पलाइन क्रमांक 139 किंवा 9004497364 वर व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करू शकतात. ज्यावर रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई केली जाईल.