महाकुंभमधील व्हायरल साध्वी हर्षा रिछारियाने दिली जीव देण्याची धमकी..

महाकुंभमधील गाजलेली साध्वी म्हणजे हर्षा रिछारिया.. हर्षा रिछारिया महाकुंभ सुरु झाल्यापासूनच, चर्चेत होती ती तिच्या सुंदर दिसण्यामुळे. आता महाकुंभची सांगता होत असताना हर्षा पुन्हा चर्चेत आलेली आहे. सध्याच्या घडीला हर्षा चर्चेत आलीय, तिने दिलेल्या आत्महत्येच्या धमकीमुळे. हर्षाने सोशल मीडीया इन्स्टाग्राम या माध्यमावर एक व्हिडीओ टाकून तिने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे.

हर्षाने तिचे व्हिडीओ एआयच्या माध्यमातून एडिट करुन तिला बदनाम करत असल्याचे सोशल मीडीयावर म्हटले आहे. परंतु देवाने मला जेवढी ताकद दिलेली आहे, तोपर्यंत मी सर्व सहन करेन असेही यावर हर्षाने म्हटले आहे. परंतु यापुढे त्रास सहन न झाल्यास मात्र ज्यांनी त्रास दिला त्यांचे नाव लिहून आत्महत्या करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

नुकत्याच केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून तिने असे म्हटले आहे की, महाकुंभ मध्ये मी हिंदू धर्मासाठी काम करणार अशी प्रतिज्ञा केली होती. परंतु हिंदू धर्माच्या विराेधातील लोकांचा मला विरोध होत आहे. रोज नाना तऱ्हेने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून हर्षाने असे म्हटले आहे की, मी साध्वी आहे असे मी कधीच म्हटले नव्हते. पण व्हिडीओच्या माध्यमातून मला अगदी सुरुवातीपासूनच बदनाम करण्यात येत आहे.

परंतु मला कितीही बदनाम केलेत तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी हिंदू धर्मासाठी काम करणार म्हणजे करणारच असेही तिने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. शेवटी ती अधिक भाष्य करताना म्हणाली, एखाद्या सकाळी मी आत्महत्या केली असे आढळले तर, जाण्याआधी मी सर्वांची नावं मात्र उघड करुनच जाईन.

हर्षा रिछारिया ही मूळची मध्यप्रदेशची असून, सध्याच्या घडीला ती उत्तराखंडमध्ये राहात आहे. हर्षा कायम पिवळी वस्त्र, कपाळावर टिळा आणि रुद्राक्ष माळा घालत असून, इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाखांपेक्षा जास्त फाॅलोवर्स आहेत.