
पीडित तरुणी मूळची फलटणची असून पुण्यात नोकरी करते. बुधवारी सकाळी ती फलटणला आपल्या गावी चालली होती. बसस्थानकात आल्यानंतर तरुणी बसची वाट पाहत बसली होती. यावेळी आरोपीही तिच्या शेजारी बसला होता. त्याने तरुणीशी ओळख करून तिला कुठे जायचे विचारले. तरुणीने फलटणला जायचे सांगितल्यानंतर आरोपीने तिला बस तिकडे लागली असल्याचे सांगत फलाट क्रमांक 22 वर उभ्या असलेल्या बसमध्ये चढण्यास सांगितले.
तरुणी बसजवळ येताच बसमध्ये अंधार असल्याने तिने याबाबत आरोपीकडे विचारणा केली. तेव्हा आरोपीने तिला ही रात्रीची बस असल्याने आतले दिवे बंद आहेत, सर्व प्रवासी झोपले आहेत, तू वर चढून टॉर्चने चेक करु शकते असे सांगितले. आरोपीच्या बोलण्याला फसून तरूणी टॉर्च लावून बसमध्ये चढली. यानंतर आरोपीही तिच्यामागोमाग बसमध्ये चढला आणि दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला आणि तेथून पळून गेला.
अत्याचारानंतर तरुणी बसमधून उतरून फलटणसाठी दुसरी बस पकडली. बसमधून जात असताना तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून सर्व घडला प्रकार सांगितला. मित्राने तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तरुणीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत आरोपी तरुणीच्या शेजारी बसल्याचा आणि तिच्या बोलताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असतून ग्रामीण हद्दीतील शिरुर गावचा रहिवासी आहे. आरोपीवर शिरुर, शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकं रवाना झाली असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात येत आहे.