Mahua Maji Accident – महाकुंभहून परतताना खासदार महुआ माझी यांचा भीषण अपघात, भरधाव कार उभ्या ट्रकला धडकली

महाकुंभहून परतताना झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माझी यांचा भीषण अपघात झाला आहे. महुआ माझी यांची कार एका उभ्या ट्रकला धडकली. या अपघातात महुआ माझी यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी रांचीच्या आरआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार महुआ माझी या आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आोटपून त्या झारखंडकडे परतत होत्या. त्यांच्यासोबत कारमध्ये त्यांचा मुलगा आणि सूनही होते. याच दरम्यान बुधवारी पहाटे चारच्या सुमारास राष्ट्रीय महारमार्ग 39 वर लातेहार ते होटवाग गावाजवळ कारने रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात खासदार महुआ माझी यांच्यासह मुलगा सोमबीत माझी, सून कृती माझी आणि गाडीचालक भूपेंद्र बास्की जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये कारचा पुढच्या भागाचा पुरता चेंदामेंदा झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या महुआ माझी यांच्यावर लातेहार येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांना त्यांना रांचीला रेफर करण्यात आले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

नक्की कसा झाला अपघात?

दरम्यान, महुआ माझी यांचा मुलगा सोमबीत यांनी अपघात नक्की कसा घडला याची माहिती दिली. प्रयागराजहून परतत असताना हा अपघात झाला. माझी आणि पत्नी मागच्या सीटवर बसले होते. मी कार चालवत होतो आणि पावणे चारच्या सुमारास माझ्या डोळ्यावर झापड आली. त्याचवेळी कार कुठेतरी धडकली. अपघातानंतर कारमधून धूर येऊ लागला. आम्ही कारमधून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो. मी आईला कारबाहेर काढले तेव्हा तिचा हात रक्तबंबाळ झाल्याचे दिसले. लातेहार येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आम्ही तिला घेऊन रांची गाठली. माईचा हात तुटला असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे सोमबीत यांनी सांगितले.