
सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याचा राग मनात धरून जावयाने सासूची हत्या केल्याची घटना मुंबईतील मुलुंड परिसरात घडली. बाबी उसरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सासूची हत्या केल्यानंतर जावयानेही स्वतःला पेटवून घेतले. कृष्णा अटनकर असे जावयाचे नाव आहे.
कृष्णाचा दहा वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी मुलासह तिच्या आईसोबत मुलुंड येथे राहत होती. सासूमुळेच आपला संसार मोडल्याचा राग कृष्णाच्या मनात होता. कृष्णा पत्नी आणि मुलाला भेटायला मुलुंडला येत असे. सोमवारीही कृष्णा मुलुंडमध्ये गेला होता. त्यावेळी त्याची सासू डॉक्टरकडे चालली होती.
कृष्णा सासूला आपल्या मिनी टेम्पोतून रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन चालला होता. कृष्णाने सासूला टेम्पोमध्ये मागच्या बाजूला बसवले आणि दरवाजा आतून लावून घेतला. यानंतर हातोडीने सासूच्या डोक्यात वार केल्याने त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर पेट्रोल आणि थिनर अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले. सासूची हत्या केल्यानंतर कृष्णाने स्वतःलाही पेटवून घेतले.
परिसरातून चाललेल्या एका व्यक्तीला टेम्पोतून आगीचे लोळ येताना दिसले. त्याने अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने आग विझवून टेम्पोचा दरवाजा उघडला असता आत बाबी आणि कृष्णा यांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी नवघर पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासाअंती सर्व प्रकार उघडकीस झाल्याने पोलिसांनी कलमातील गुन्ह्यात वाढ केली.