
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा दारूण पराभव स्वीकारावा लागला. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही नवी दिल्ली मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला. तेव्हापासून केजरीवाल यांनी माध्यमांपासून अंतर राखले आहे. त्यांची पुढील रणनीती काय असे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच अरविंद केजरीवाल नव्या इनिंगसाठी सज्ज झाले असून ते पंजाबमार्गे राज्यसभेत जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली.
पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथून आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. संजीव अरोरा यांच्या जागी राज्यसभेवर अरविंद केजरीवाल यांची वर्णी लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली.
Punjab | Aam Aadmi Party has fielded Rajya Sabha MP Sanjeev Arora as its candidate for the Ludhiana West by-election. pic.twitter.com/0dEdJpwA29
— ANI (@ANI) February 26, 2025
राष्ट्रीय राजकारणामध्ये आपचे बळ वाढवण्यासाठी आणि पंजाब व दिल्लीचे मुद्दे उपस्थित करून मोदी सरकारला वरच्या सदनामध्ये घेरण्यासाठी केजरीवाल राज्यसभेत जातील अशी शक्यता होती. सुरुवातीला अरविंद केजरीवाल हे संजीव अरोरा यांच्या रिक्त जागेवरून राज्यसभेत जातील असा कयास होता. मात्र आता आपने याबाबत स्पष्टीकरण दिले असून केजरीवाल राज्यसभेत जाणार नाही हे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप लुधियाना पश्चिमच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याचवेळी पंजाबमधील पोटनिवडणूकही घेतली जाईल, अशी शक्यता आहे.