
हिमाचलमधील अनेक ठिकाणे ही भटकंतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे चैल. चैलचे सौंदर्य हे अवर्णनीय असेच आहे. चंदीगडपासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेले चैल हिल स्टेशन हे अतिशय सुंदर ठिकाण आहे तसेच परवडणारे ठिकाण आहे.

घनदाट जंगले आणि देवदाराची झाडे या ठिकाणाचे आकर्षण वाढवतात. बजेट फ्रेंडली हे ठिकाण असून, याठिकाणी अप्रतिम दऱ्यांचा आनंद घेऊ शकता. जवळपास ५००-१००० रुपयांत राहण्यासाठी हॉटेल्स सहज उपलब्ध आहेत.हिमाचल प्रदेशचे हे छोटेसे हिल स्टेशन जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदानासाठी देखील ओळखले जाते. मित्र, कुटुंब किंवा जोडीदारासोबत कधीही भेट देण्यासाठी चैल हे एक योग्य ठिकाण आहे. तुम्ही चैलला भेट द्यायला जाल तेव्हा चैल वन्यजीव अभयारण्य, काली का टिब्बा, गुरुद्वारा साहिब, सिद्ध बाबा मंदिर, चैलचे क्रिकेट मैदान आणि सुंदर चैल पॅलेस येथे नक्की भेट द्या.

काय करावे: तलाव आणि निसर्ग पर्यटन, नौकाविहार आणि ट्रेकिंग. याशिवाय चैलमध्ये पॅराग्लायडिंगचाही आनंद लुटता येतो. चैलमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक म्हणजे चैल पॅलेस. इथे एक राजवाडा आहे, इथली वास्तू नजरेसमोर येते. राजवाड्याच्या आजूबाजूला असलेली हिरवाई प्रत्येकाला त्याकडे आकर्षित करते. चैलमध्ये अशी अनेक सुंदर उद्याने आहेत तिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.

चैल हिल स्टेशन येथे असलेले काली माता मंदिर हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. येथील स्थानिक लोकांचे ते अतिशय पूजनीय मंदिर आहे. चैल क्रिकेट ग्राउंड खूप प्रसिद्ध आहे. हे भारतातील उंचावरील क्रिकेट मैदान आहे. चैल क्रिकेट ग्राउंड हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2350 मीटर उंचीवर बांधले गेले आहे. क्रिकेट सोबत येथे पोलो खेळला जातो. हे मैदान महाराजा भूपेंद्र सिंह यांनी १८९३ च्या सुमारास बांधले होते, असे सांगितले जाते.
तुम्हाला जर वन्यजीव अभयारण्यांसोबतच नैसर्गिक ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल, तर चैल वन्यजीव अभयारण्य तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला प्रत्येक प्राणी बघायला मिळतील. येथील हिरवळ आणि विहंगम दृश्ये तुमचे मन जिंकतील. पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे.