आश्चर्यच ! चौकच्या तुपगाव बौद्धवाडीचा रस्ता गेला चोरीला, 10 लाखांचा निधी खर्ची पडला पण रस्ता सापडेना

चौक परिसरातील तुपगाव बौद्धवाडीत एक अजब प्रकार घडला आहे. तब्बल 10 लाख रुपये खर्च करून बांधलेला रस्ता प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. हा निधी कागदोपत्री मंजूर असला तरी तुपगाव भागात हा रस्ता शोधूनही सापडत नसल्याने रस्ता चोरीला गेला असे म्हणण्याची वेळ तुपगाव येथील ग्रामस्थांवर आली आहे. हे आश्चर्य म्हणायचे की भाजप आमदार महेश बालदी यांनी केवळ निधी खर्च झाल्याचे दाखवले याची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आमदार महेश बालदी यांनी तुपगाव बौद्धवाडीतील अंतर्गत रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. मात्र आरटीआय कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागवलेल्या कागदपत्रांमधून हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रस्त्याची दोन कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या रस्त्याचा कुठे मागमूसही नाही. एवढेच नव्हे, तर काम पूर्ण झाल्याचे सांगणारा फलकही गावात कुठेच दिसत नाही. ग्रामस्थांच्या वाढत्या आक्रमकतेमुळे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते गावात दाखल झाले. मात्र त्यांनाही रस्ता सापडला नाही.

ठिय्या आंदोलनाचा इशारा

रस्ता कामात अपहार झाल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा हा प्रकार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जर दोषींवर तत्काळ कारवाई झाली नाही तर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य नीलेश मोरे यांनी दिला आहे.