दारू पिऊन लग्नाला उभा राहिला नवरा, नवरीच्या जागी मैत्रिणीलाच घातला हार

उत्तर प्रदेशमध्ये लग्नात नवऱ्या मुलाने दारू पिऊन धिंगाणा केल्याचे अनेक प्रकार ऐकायला मिळत असतात. असाच प्रकार घडला बरेलीमधील एका लग्नात. या लग्नात दारूच्या नशेत तर्राट होऊन आलेल्या एका नवऱ्या मुलाने स्वत:च्याच लग्नात गोंधळ घातला. त्याने लग्नाच्यावेळी नवरी मुलीच्या ऐवजी तिच्या मैत्रिणीलाच हार घातला. याप्रकारामुळे संपातलेल्या नवरीने नवरदेवाच्या थाडकन श्रीमुखात लगावली.

राधा देवी (21) असे त्या नवरीचे नाव असून तिचे रविंद्र कुमार नावाच्या तरुणासोबत लग्न होणार होते. सोमवारी रविंद्र कुमार वरात घेऊन हॉलवर पोहोचला. लग्नाला येण्याआधी रविंद्र मित्रांसोबत दारू प्यायला होता. हॉलवर आल्यानंतर रविंद्रच्या पालकांनी मुलीच्या पालकांकडे अधिकचा हुंडा मागितला. त्यावरून काही काळ दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र दारूच्या नशेत असलेल्या रविंद्रने वरमालाच्या वेळी राधा देवीच्या मैत्रिणीलाच हार घातला. त्यामुळे भडकलेल्या राधा देवीने त्याच्या कानशिलात लगावली व लग्नास नकार दिला.

घडलेल्या प्रकारामुळे संतापलेल्या दोन्ही कुटुंबात पुन्हा राडा झाला, वर वधूकडील नातेवाईक एकमेकांवर खुर्च्या फेकू लागले. काही नातेवाईकांनी पोलिसांना बोलवल्यानंतर हा प्रकार थांबला. याप्रकरणी वधूच्या कुटुंबाने नवरा मुलाच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा केल्याप्रकरणी रविंद्र व त्याच्या मित्रांना अटक केली. तर मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला व त्यांना मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा रविंद्रच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आला आहे.