
मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्यावरून महायुती सरकारमध्ये वाद सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेत 25 लाख द्या, सहाय्यक आयुक्त व्हा या आशयाचे मेसेज व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या ठाणे महापालिकेमध्ये या मेसेजमुळे पुन्हा चर्चेला उधाण आले असून प्रशासनातील दोन फिक्सर अधिकारी कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियाच्या काळात आता छोट्यातील छोटी गोष्टसुद्धा लपून राहत नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदलीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्याने वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ’25 लाख द्या आणि सहाय्यक व्हा तसेच हव्या त्या प्रभाग समितीत बदली करून घ्या’ असा मेसेज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल होत असल्याने गोंधळ उडाला आहे. या मेसेजमध्ये ‘गजानना’च्या आशीर्वादामुळे अधिकाऱ्यांना पद मिळायला लागले असून पैशांचा ‘प्रशांत’ महासागर बघायला मिळेल असेही नमूद करण्यात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून सोशल मीडियावर काय फिरत आहे याबद्दल आपल्याला कल्पना नाही, परंतु ज्या काही बदल्या करण्यात आल्या हा कामाचाच एक भाग आहे. तसेच नियमानुसारच सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, असे आस्थापना विभागाचे उपायुक्त गजानन गोदेपुरे म्हणाले.
मलईदार खात्यासाठी धडपड
मागील काही महिन्यात प्रशासनात बदली आणि बढतीचे सत्र सुरू आहे. त्यात आता मर्जीतील विभाग मिळावा, मलईदार प्रभाग समिती मिळावी यासाठी अधिकारी धडपड करीत आहेत, तर नुकतीच तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. सेवाज्येष्ठतामध्ये बसत नसतानाही सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचेदेखील या मेसेजमध्ये नमूद आहे. या नियुक्तीवरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.