‘ध्येय मल्टिस्टेट’चे पैसे लुटणारे तिघे सूत्रधार नऊ महिन्यांनंतरही मोकाटच !

नगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टिस्टेट’च्या शाखा सुरू करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक करणारे मुख्य सूत्रधार चेअरमन विशाल भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे, संचालक व सीईओ राहुल कराळे हे तिघे 9 महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आता या गुन्ह्याचा तपास थंडावल्याने ठेवीदार हवालदिल झाले असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘ध्येय मल्टिस्टेट’च्या शाखा सुरू करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून 112 ठेवीदारांचे 5 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह ७ जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात 16 मे 2024 रोजी गुन्हा दाखल केला होता.

चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. नगर), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), पूजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे रा. बोरुडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गुन्हा दाखल झाल्यापासून 9 महिन्यांत यातील एकालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पुढे यातील मुख्य सूत्रधार आणि ज्यांना सह्यांचे अधिकार होते त्या चेअरमन विशाल भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे, संचालक व सीईओ राहुल कराळे या तिघांच्या व्यतिरिक्त इतर चौघांनी या घोटाळ्यात आपला संबंध नसल्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे यातील दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे लाटणारे आरोपी 9 महिने झाले तरी मोकाट फिरत आहेत, यामागील गौडबंगाल काय, असा सवाल ठेवी अडकलेले सर्वसामान्य ठेवीदार करीत आहेत.