
सिडकोच्या गलथान कारभारामुळे द्रोणागिरी नोडमधील 427 घरे विक्रीअभावी मागील काही वर्षांपासून धूळखात पडून आहेत. विशेष म्हणजे सिडकोने या घरांच्या जाहिरातींसाठी तब्बल 700 कोटींचे कंत्राट दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेकडो कोटींचा चुराडा करूनही ही नामुष्की ओढवल्याने ‘लाडक्या एजन्सीचे’ चांगभले करण्यासाठी नेमका कोणाचा अट्टहास होता, असा सवाल विचारला आहे. एजन्सीवर उडवण्याऐवजी घरांच्या किमती कमी केल्या असत्या तर लॉटरीत घरांवर ग्राहकांच्या उड्या पडल्या असत्या असा संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील वाशी, खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल, खारघर, उलवे, खांदेश्वर, बामण डोंगरी, उरण-द्रोणागिरी नोडमध्ये आर्थिक दुर्बल घटक आणि अल्पा उत्पन्न गटासाठी घरे उभारण्यात आली आहेत. मात्रा सिडकोने सामान्यांसाठी उभारण्यात आलेल्या घरांचा एरिया कमी असताना किमती खासगी बिल्डरांच्या घरापेक्षा अधिक असल्याने अनेकांनी घरे सिडकोला परत केली आहेत. त्याशिवाय बांधकामाचा दर्जा आणि सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात सिडको अपयशी ठरली आहे. त्यातच घरांची जाहिरात करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला ७०० कोटींचे कंत्राट दिले आहे. सिडकोने जर घरांच्या किमती कमी केल्या असत्या तर जाहिरातींवर ही उधळपट्टी करण्याची गरज सिडकोला लागली नसती असा संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कामे
द्रोणागिरी नोडमधील सिडकोची 427 घरे विक्रीअभावी मागील काही वर्षांपासून धूळखात पडून असल्याचा आरोप किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा गावठाण हक्क परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी केला आहे. जाहिरातींसाठी नेमलेली एजन्सी रायगड भवनातील कार्यालयात बसून कारभार करत असून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही कामे केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे