परदेशी पाहुण्यांचे हत्तूरमध्ये आकर्षण, मंगोलिया, रशियातील चक्रवाक बदके दाखल

सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या हत्तूर येथे विजापूर-पुणे महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात दोन ते तीन महिन्यांपासून नानाविध प्रजातींच्या पक्ष्यांनी आपला डेरा टाकला आहे. त्यानंतर आता येथे विदेशी पक्ष्यांनीही आपली हजेरी लावली आहे. मंगोलिया व रशिया येथील मूळ वास्तव्य असणारी व हिमालयातील मानसरोवरात वीण घालणारी अनेक ‘चक्रवाक’ बदके येथील दलदलीत येऊन दाखल झाली आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोनेरी रंगाची बदके आकर्षण ठरत आहेत.

महामार्ग व सेवारस्त्याच्या निर्मितीवेळी हत्तूर गावाजवळ पावसाचे पाणी साठून भलामोठा पाणवठा तयार झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत या ठिकाणी दलदल तयार होऊन पाणवठ्यात ‘पाणकणीस’ ही जलवनस्पती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे नानाविध पक्ष्यांना चरण्यासाठी व अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नवीन जलस्थानावर पक्ष्यांच्या बहुविध प्रजातींच्या हजेरी सातत्याने वाढत आहे. पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार या ठिकाणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने निरीक्षण करीत नोंदी ठेवत आहेत.

मराठी साहित्यात चक्रवाक पक्ष्यांचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. या बदकांना ‘प्रणयी पक्षी’ म्हणून ओळखतात. या पक्ष्यांमध्ये एकदा जमलेली जोडी आयुष्यभर साथ निभावते. तसेच एखाद्याचा अंत झाला तर दुसरे प्राणत्याग करते, असा उल्लेख मराठी साहित्यात आहे.

इंग्रजीत या बदकाला ‘रुडी शेल्डक’ व भारतात ‘ब्राह्मणी डक’ या नावाने ओळखले जाते. ब्राह्मणी बदक हे मराठीतील अन्य नाव आहे. या बदकाला निसर्गाने विविध रंगांची उधळण केली आहे. पिसारा भगवा किंवा बदामी रंगाचा सोनेरी असतो. शेपटी काळ्या रंगाची, चोच काळी व पाय पुसट पांढरे असतात. नर चक्रवाकच्या गळ्यात काळा गोफ असतो. विविध रंगसंगतीने सुंदर दिसणारे हे स्थलांतरित पाहुणे पक्षी महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.