Mahashivratri 2025 – सोमपुरीत हजार वर्षांपूर्वीची बारव अन् हेमाडपंती शिवमंदिर; धार्मिक ठेवा मोजतोय शेवटच्या घटका

>> विजय शेजूळ

पैठण तालुक्यातील सोमपुरी येथे 1 हजार वर्षांपूर्वीची प्राचीन बारव असून येथेच हेमाडपंती पद्धतीचे नितांतसुंदर शिवमंदिर आहे. राज्य शासन आणि पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हा धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा शेवटच्या घटका मोजत आहे.

बिडकीन शहरापासून दक्षिणेस 4 किलोमीटर अंतरावर सोमपुरी हे अवघ्या 300 उंबऱ्यांचे गाव आहे. लोकसंख्या सुमारे 2 हजार आहे. गावातील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस सुमारे हजार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली प्राचीन बारव आहे. बारव चौकोनी आकाराची असून चारही बाजूंनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. ही बारव विजया बारव म्हणून ओळखली जाते. एका बाजूने पायऱ्या आसलेली नंदा बारव, दोन्ही बाजूने पायऱ्या आसलेली भद्रा बारव, तीनही बाजूने पायऱ्या असलेली जया बारव तसेच चार बाजूने पायऱ्या असलेल्या बारवेला विजया बारव म्हणतात. या बारवेमध्ये दगडी मंडपात शिवमंदिर आहे. शेकडो वर्षाचा पुरातन ठेवा असलेली वास्तू काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्यामुळे त्यात काडी-कचरा, दगड-गोटे, घाण साचलेली आहे. पडझडीमुळे बारवेचा श्वास गुदमरत असून हा अनमोल ठेवा आता शेवटची घटका मोजत आहे.

बारवेवर 7 देवकोष्ट असावेत. देवकोष्ट म्हणजे साधारण दगडी मोठा कोनाडा. यात विविध देवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या असतात. सध्या सात पैकी पाच देवकोष्ट बऱ्या अवस्थेत असून दोन देवकोष्टाचे अवशेष मंदिरातच विखुरले आहेत. मात्र या बारवेतील देवकोष्टांमध्ये कोणत्याही देवतांच्या मूर्ती नाहीत. सभामंडप कसाबसा तग धरून आहे. अनेक स्तंभ नामशेष झाले आहेत. काळाच्या ओघात काही पडले, त्याचे अवशेष तेथेच पडलेले आहेत. या दगडी मंडपासमोर स्थानिक महिलांनी शिवलिंगाची तात्पुरत्या उत्तराभिमुख स्वरूपात स्थापना केलेली आहे.

सोमनाथचे प्रतिरुप सोमपुरी

हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात प्रथम आणि अतिप्राचिन ज्योतिर्लिंग म्हणून गुजरातेतील सोरटी सोमनाथास पौराणिक मान्यता आहे. याच सोमनाथचे प्रतिरुप म्हणजे या बारवेतील शिवलिंग होय. भगवान सोमनाथ या नगरीत राहतात म्हणून सोमपुरी असे गावाचे नाव असल्याची माहिती गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दिली.

स्वच्छता अभियान अन् जीर्णोद्वाराची तयारी

काही दिवसांपूर्वी आनंदेश्वरी सेवाभावी संस्थेतर्फे बिडकीन शहरातील बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या बारवेची स्वच्छता करण्यात आली होती. याची शासन स्तरावर दखल घेऊन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या बारवेचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सोमपुरी येथील दुर्लक्षीत बारवेच्या स्वच्छतेसाठीही पुढाकार घेतला जात आहे. बिडकीन, सोमपुरी व परिसरातील तरुणांच्या सहकार्याने श्रमदान करत स्वच्छता मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाकडे बारवेच्या जिर्णोद्धाराकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आनंदेश्वरी संस्थेचे सचिव सचिन हाडे आणि प्रवीण चव्हाण हे प्रयत्न करत आहेत.