
नेरळवासीयांची पाणीटंचाईच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी मोठा गाजावाजा करत आठ कोटी रुपये खर्चुन पाणी योजना राबविण्यात आली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार धीम्या गतीने हे काम करत असून गेल्या दोन वर्षांपासून टाकीचे काम रखडले आहे. त्यामुळे टेपआळी भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. फक्त दहा मिनिटे करंगळीइतके नळाला पाणी येत असल्यामुळे महिलांची पाण्यासाठी अक्षरशः बोंबाबोंब होत आहे.
नेरळ वॉर्ड क्रमांक सहामध्ये असणाऱ्या टेपआळी येथील खोलमकर विभागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळाला येणारे पाणी केवळ पाच ते दहा मिनिटे येते. पाणीटंचाईविरोधात डिसेंबर महिन्यात महिलांनी प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांची भेट घेतली होती. त्यानंतर पाणीपुरवठा झाला, परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पाणी साठवणूक करणारी जुनी प्लास्टिकची टाकी फुटली आहे. त्याचेही काम प्रशासनाने केले नाही. असे असतानाही पाण्याची जुनी टाकी फोडण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या टाकीचे काम रखडले आहे. त्यामुळे टेपआळीवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
रोज मरे त्याला कोण रडे !
टेपआळी येथील काही परिसर डोंगर परिसरात वसलेला आहे. गावातील लोकसंख्या वाढल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ लागला. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था टेपआळीतील नागरिकांची झाली आहे. नवीन पाणी योजनेच्या कामाची मुदत संपलेली आहे. ती मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. १५ मार्चपर्यंत पाणीटंचाईची समस्या निकालात निघेल असे प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी सांगितले.