
>> संजय जोशी
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील प्राचीन मुर्डेश्वर देवस्थान महादेव मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. संस्थानात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. संस्थानात यावर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असल्याचे संस्थान पीठाधीश ओमकार गिरी महाराज यांनी सांगितले.
मंदिरावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठ्याच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या या देवस्थानाचा महाराष्ट्र शासनाने ‘ब’ दर्जात समावेश केला असून, विविध विकास कामे या ठिकाणी प्रगतिपथावर आहेत. काही कामे पूर्ण झाली आहे तर काही कामाना मंजुरी मिळून ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
या क्षेत्राविषयी थोडक्यात आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाई या खान्देश भागाकडून जात असतांना सीता मातेस शिवपूजेची आठवण झाली. त्यांनी शिवलिंग स्थापन करून मागे खान्देशकडे वळून (मुरडून) पाहिले म्हणून या स्थळास मुडेंश्वर हे नाव पडले. नंतर प्रभू राम सीतामाई चार दिवस याठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या पाऊलखुणा आजही मुडेंश्वर परिसरात बघायला मिळतात.
हे अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र असून, मुर्डेश्वराचे मंदिर हे हेमाडपंती आहे. डोगराच्या कडेला आहे. चौहोबाजूनी घनदाट जंगल, डोंगर, कडे, कपारी व त्यावर हे महादेवाचे विलोभनीय मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारता येत नाही हे विशेष आहे. या मंदिरातील स्वागत चौकटीमध्यावर गणेश तर खालील दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. तसेच पाने फुलेयुक्त सुरेख वळणावर वेलबुटीचे उत्कृष्ट व आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या खांबावर कल्पायुक्त महिरपीचे कळयाफुलांनी यादवकालीन चंद्र-सूर्य, गरूड कुबेर, यक्ष, किजर, इंद्र आहेत. आजच्या युगातील स्थापत्यविशारदसुद्धा अशी बांधणी करू शकत नाहीत. अशी बांधणी या मंदिराची केलेली आहे. काही पुरातन लेखही त्यावर कोरलेले आहेत. हे मंदिर अतिप्राचीन आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा परिसर झाडे, नागमोडी वळणे, खोल दऱ्या, पशु पक्षी यांनी नटलेला असल्याने एक नयनरम्य अनुभूती या ठिकाणी येते. येथे रानकेळी, साग, जांभूळ, पळस असे आयुर्वेदिक औषधीनी समृद्ध असे अनेक वृक्ष असून, येथे असणारे जुनाट वटवृक्ष शेकडो वर्षांचे साक्षीदार आहेत.
मराठवाडा, खान्देशच्या सरहद्दीवर आणि आमठाणा (ता. सिल्लोड) पासून उत्तरेस 8 कि. मी. अंतरावर अजिंठ्याच्या डोंगररांगांच्या कुशीत भक्तीसोबत पर्यटनाचाही आनंद येथे मिळतो. स्वर्गीय ब्रह्मलीन बालयोगी काशिगिरी महाराज यांचा महाराष्ट्र भर असणारा शिष्यगण याठिकाणी बाबांवर दर्शनासाठी येत असतो, बांबावर असणाऱ्या श्रद्धेमुळे येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेदिवस वाढत आहे. काशिगिरी महाराजांच्या गादीवर ओमकारगिरी महाराज विराजमान झाले असून तेच मुडेंवर संस्थांनचे पीठाधीश म्हणून आता संस्थांनचा कारभार पाहत आहेत.
शिवरात्रीला मोठी यात्रा
या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रभू श्रीराम थांबल्याचे आख्यायिकेत नमूद असल्याने भाविकांची या शिवलिंगावर अपार श्रद्धा आहे. वर्षभर या देवस्थानावर भाविकांची मोठी गर्दी असते, तर महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरत असल्याने संपूर्ण तालुक्यातून व्यावसायिक याठिकाणी बैल, फुल, प्रसादाची दुकाने, खेळणी, मिठाई, हॉटेल्स, रहाटपाळणे आदी दुकाने थाटतात.