Mahashivratri 2025 – पैठणचे यज्ञकुंडी आकाराचे शिवमंदिर, सूक्ष्मरीत्या वाढते आहे शिवलिंग

>> बद्रिनाथ खंडागळे

पैठणच्या गोदापात्रात उभारण्यात आलेल्या विनाछताच्या ‘सिद्धेश्वर’ महादेव मंदिराची वास्तुरचना यज्ञकुंडाच्या आकाराची आहे. येथील अद्भुत शिवलिंग वर्षानुवर्षांपासून आकाराने सूक्ष्मरीत्या वाढत असून, पिंडीतून सतत पाझरणारे पाणी हे या शिवमंदिराचे वैशिष्ट्य आहे.

1 हजार वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी केली गेली असावी. कारण पैठणच्या ब्रह्मसभेतील न्यायपीठाकडे शुद्धिपत्र मागायला आलेल्या संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांनी परत जाताना याच सिद्धेश्वर शिवमंदिरात 4 महिने मुक्काम केला होता. तेव्हापासून दर महाशिवरात्रीला या परिसरात ग्रामजत्रा भरते, अशी माहिती वेदशास्त्रसंपन्न कमलाकर गुरु शिवपुरी यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिरासह सिद्धेश्वर घाटाचाही जीर्णोद्धार केल्याचे दाखले मिळतात. या मंदिराची रचनाच अशी केली आहे की, भक्तांना पायऱ्या चढून नव्हे, तर उतरून शिवलिंगाकडे जावे लागते. थेट गोदावरी नदीच्या पात्रात उभारलेल्या या हेमाडपंती मंदिराला छतच नाही. वरुन पाहिल्यावर वास्तुरचना पूर्णपणे यज्ञकुंडाच्या आकाराची असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

शिवरात्रीच्या ग्रामजत्रेत माठबाजार!

या मंदिर परिसरातच आजही वापरात असलेली सिद्धेश्वर हिंदू स्मशानभूमी आहे. दरवर्षी शिवरात्रीला येथे गावजत्रा भरते. भल्या पहाटेपासून शिवलिंग पूजन करुन विधिवत धार्मिक कार्यक्रम केले जातात. मंदिर परिसरात छोटीशी जत्रा भरते. या गावजत्रेतील माठबाजार प्रसिद्ध आहे. पैठण शहरासह पंचक्रोशीतील सर्वधर्मीय महिला येथून मातीचे माठ व रांजण खरेदी करतात. उन्हाळाभर त्यांचा वापर केला जातो.

दुर्मिळ वास्तुरचना

सिद्धेश्वर मंदिराची वास्तुरचना दुर्मिळ या प्रकारात मोडणारी आहे. मुख्य रस्त्यापासून 28 दगडी पायऱ्या उतरून खाली नदीपात्राकडे जावे लागते. नंतर विनाछताचे यज्ञकुंडाच्या आकाराचे मंदिर दिसते. हे मंदिर चढून नव्हे, तर पुन्हा 20 पायऱ्या उतरुन शिवपिंडीकडे जावे लागते. तेथे आणखी एक वैशिष्ट्य पाहून भाविक आश्चर्यचकित होतात. महादेवाच्या मुख्य पिंडीवर जलकलश नसला तरी शिवलिंग कायम ओलसर असते! या पिंडीच्या बाजूला असलेली एक स्वयंभू पिंड वर्षानुवर्षे सूक्ष्मपणे वाढत चाललेली आहे. 40 वर्षांपूर्वी बोराच्या आकाराचे हे शिवलिंग सध्या आंब्याचा आकार धारण केलेले पाहायला मिळते. हे शिवलिंगसुद्धा कायम भिजलेले असते. छोटे शिवलिंग खोलगट जागी असून, कायम पाण्यात असते ! नदीला पूर आल्यावर मंदिरासह गाभारा अन् शिवलिंगे पाण्याखाली जातात. कडकडीत उन्हाळ्यात नदीचे पाणी आटते. वाळवंट शिल्लक राहते. या काळात शिवलिंगावरचा पाझर कमी होतो, परंतु कधीही पाझर थांबलेला नाही. याबाबत शिवभक्त फौजदार जाधव यांनी सांगितले की, ‘आपोआप व कायमस्वरूपी ओलसर असणारे 4 शिवलिंग महाराष्ट्रात आहेत. त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, वृद्धेश्वर (तिसगाव, ता. पाथर्डी) व पैठणचे सिद्धेश्वर. तथापि पैठणच्या मंदिराची वास्तुरचना अद्वितीय असावी. कारण मंदिरात चार जागी यज्ञकुंडाचा आकार देऊन मंदिराची केलेली उभारणी चकित करणारी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

खिचडीचे होणार वाटप

दरवर्षी शिवभक्त स्वयंसेवक हे लोकवर्गणीतून उपवासाची साबुदाणा खिचडी तयार करतात. यावर्षी अनेक दानशूरांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे तब्बल १२ क्विंटल साबुदाणा व २ क्विंटल शेंगदाणे मिळाले आहेत. मिरच्या व बटाटे आदी साहित्य मिळाले. तसेच पायऱ्यांसह मंदिर परिसराचे नूतनीकरण व दुरुस्ती यासाठी आमदार विलास बापू भुमरे यांनी लाखो रुपयांचा स्वयंनिधी खर्च केला आहे, अशी माहिती शिवभक्त स्वयंसेवक आशिष पवार व पुजारी कुणाल गुरव यांनी दिली. शिवभक्त स्वयंसेवक राजू गुरव, दिनेश माळवे, फौजदार जाधव, आशीष पवार, उमेश नरवडे, भानू वायचळ, मुकुंद राऊत, रमेश खांडेकर, सागर पाटील, ओम कुडके, विकास किडे, गौरव दहीवाळ, उमेश परळकर, कृष्णा डोळझापे, यश पळसकर, आदित्य भोसले, मंगेश पानपट, किरण बोंबले, अक्षय रोकडे, भोलानाथ परदेशी, बाळू म्हस्के, कृष्णा जगधणे, सनी डोळझापे, तुषार शिरसाठ, नितीन चौतमल, बबलू नरके, शिवम नाईक, दिलीप सनवे, राम खंडागळे, गणेश राऊत, ओंकार दुधाळ, रुद्र जोमदे, श्याम परळकर, सोमा वीर, नितीन रावस, अजिंक्य बारे, विठ्ठल रोकडे, शुभम कुडके, भागवत रोकडे, रामेश्वर वाघे, विशाल मानमोडे, एकनाथ शिपनकर, साहील परदेशी, महेश साळुंके, मंदार उज्जैनकर, जय क्षीरसागर, तात्या घेवारे, विजय पदार, ललित कायस्थ, सार्थक पवार, गणेश जाधव, केतन मांदळे, विशाल मानमोडे, आदित्य काटकर, आबा घोडके, संगम जटाळे व हरिओम वैष्णव हे परिश्रम घेत आहेत.