
जेऊर येथील बहिरवाडीतील तरुण शेतकरी संतोष दारकुंडे यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात शेवंतीचे पीक घेतले आहे. फुलोऱ्यात आलेल्या या पिकाचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी शेतात 200 एलईडी बल्ब लावले आहेत. एलईडीचा झगमगाट रात्री लक्ष वेधून घेत आहे.
थंडीच्या दिवसांत या फुलांच्या वाढीसाठी प्रकाशाची गरज असते. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने अर्ध्या एकरात 200 एलईडी बल्ब लावून पिकाची जोपासना केली. रोपांच्या वाढीसाठी बल्बच्या माध्यमातून प्रकाश देण्याचा जिल्ह्यातील हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा.
भरपूर सूर्यप्रकाश लागत असल्याने शेवंतीची लागवड मार्च-एप्रिलमध्ये केली जाते. त्यामुळे त्यास उन्हाळ्यातील पीक म्हटले जाते. थंडीत रात्र मोठी व दिवस छोटा यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव आणि थंडीची बाधा यामुळे रोपांची वाढ होत नाही. या अडचणीवर उपाय म्हणून बल्पचा प्रयोग केला आहे.
याबाबत बोलताना दारकुंडे म्हणाले, ‘मार्चमध्ये शेवंती फुलाची कमतरता जाणवते. ती चार महिने राहते. यासाठी आम्ही आमच्या गुलाब शेतीत आंतरपीक म्हणून ‘बिजली’ या पांढऱ्या शेवंतीची नोव्हेंबरमध्ये लागवड केली. रोपांच्या वाढीसाठी प्रकाशाची ऊब देण्याचा प्रयोग केला. अर्ध्या एकरात केबल अंथरून 200 एलईडी बल्ब लावले. यासाठी 40 हजार खर्च आला. आता या प्रयोगाचा चांगला परिणाम दिसून शेवंतीच्या रोपांची झपाट्याने वाढ झाली आहे.’
‘ही शेवंती बिगरहंगामी आहे. तिला फूल येण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात फुले सुरू होतील. या वेळेस बाजारात पांढरी शेवंती फूल मिळत नाही. यामधून आम्हाला खर्च वजा जाता, अंदाजे सात लाख रुपये उत्पन्न मिळेल,’ असे ते म्हणाले, रात्रीच्या वेळी अंधारात चमकणाऱ्या या एलईडी बल्बचा झगमगाट पाहून कुतूहलाने अनेक शेतकरी शेती पाहायला येतात.