
तेलंगणातील नागरकुरनूल जिह्यातील एका बांधकामाधीन बोगद्याचा छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आठ बेपत्ता कामगारांचा अद्याप शोध लागलेला नाही. 42 किमी लांबीच्या पाण्याच्या बोगद्यात शनिवारपासून कामगार अडकले आहेत. 584 जणांची टीम बचावकार्यात गुंतली आहे. तीन दिवसांहून अधिक काळ गाळ आणि पाण्याचा सतत प्रवाह सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. एसएलबीसी बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचे तेलंगणाच्या मंत्र्याने सांगितले.
लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयआयटी चेन्नई आणि एल अॅण्ड टी पंपनीच्या तज्ञांची फौज बचावकार्यात गुंतली आहे. बचाव पथकाने बोगद्यातील अपघात स्थळाची पाहणी केली असता आत जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने माघारी परतावे लागले. बोगद्याच्या आतील भागात कर्मचाऱ्यांनी बेपत्ता कामगारांना नावाने हाक मारली, पण प्रतिसाद मिळाला नाही. कामगार बोगद्याच्या नेमके कोणत्या ठिकाणी अडकले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. जोपर्यंत बोगद्यातील पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत ढिगारा साफ करण्याचे काम सुरू होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.