…अन्यथा पुढच्या महाकुंभापर्यंत नद्यांचे वाळवंट, सोनम वांगचुक यांचे पंतप्रधान मोदी यांना खुले पत्र

हिंदुस्थानने हिमनद्यांच्या संवर्धनात पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन लडाख येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या पत्राद्वारे केले. हिमालयातील हिमनद्यांची परिस्थिती गंभीर असून जर या हिमनद्या वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या महाकुंभापर्यंत पवित्र नद्या सुकून त्यांचे वाळूत रूपांतर होऊ शकते. या हिमनद्या आपल्या नद्यांचे उगमस्थान आहे आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे, असा इशारा वांगचुक यांनी दिला.

सोनम वांगचुक यांनी हवामान बदलामुळे वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी लडाखमधील हिमनदीवरून बर्फाचा तुकडा घेऊन आपला अमेरिकेचा प्रवास सुरू केला होता. ते अलीकडेच मायदेशात परतले आहेत. वांगचुक हिमालयातील हिमनद्यांच्या संवर्धनावर काम करत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय हिमनद्यांच्या संवर्धनाचे वर्ष’ म्हणून घोषित केले.

हिमनद्यांच्या संवर्धनासाठी हिंदुस्थानने पुढाकार घ्यावा. कारण हिमालय हा पृथ्वीवरील बर्फ आणि बर्फाळ पाण्याचा तिसरा सर्वात मोठा साठा आहे. गंगा आणि यमुना यासारख्या आपल्या पवित्र नद्या याच हिमनद्यांमधून उगम पावतात. हिमालयातील हिमनद्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने एक आयोग स्थापन करायला हवा. पंतप्रधान मोदींना भेटून लडाखच्या लोकांच्या वतीने बर्फाचा तुकडा द्यायचा आहे जेणेकरून त्यांना या संकटाने ग्रस्त असलेल्या या प्रदेशातील लोकांचा संदेश देता येईल, असेही वांगचुक यांनी पत्राद्वारे म्हटले.