हिंदुस्थानातील कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्बंध, इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक केल्याचा आरोप

इराणवर अमेरिकेने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर निर्बंध लादले असून आता इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या संलग्न कंपन्यांनाही ट्रम्प प्रशासनाने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प यांनी हिंदुस्थानातील चार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. इराणमधून निर्यात होणारे कच्चे तेल आणि पेट्रोलियमची उत्पादने यांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची यादीच अमेरिकेने तयार केली असून त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे.

ट्रम्प यांनी निर्बंध लादलेल्या 4 हिंदुस्थानी कंपन्यांमध्ये नवी मुंबईतील फ्लक्स मेरिटाईम एलएलपी या कंपनीचाही समावेश आहे. याशिवाय दिल्ली एनसीआरमधील बीएसएम मरीन एलएलपी, ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, तंजावरमधील कॉसमॉस लाइन्स इंक या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी तीन कंपन्या या इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या व्यावसायिक  असल्याचा आरोप आहे. तर कॉसमॉस लाइन्स कंपनीवर इराणच्या पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केल्याचा ठपका आहे.