
शाळाशाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांचे आयोजन, नववीपर्यंतच्या वर्गांची उजळणी सुरू असतानाच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे ‘स्क्कॉफ’ नामक एका नव्या उपक्रमाच्या नावाने तब्बल 128 विविध मानकांवर माहिती भरताना आणि तितकेच फोटो अपलोड करताना शिक्षक बेजार झाले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एमसीईआरटी) 3 फेब्रुवारीच्या एका पत्राद्वारे शाळांच्या माथी मारण्यात आलेले हे काम 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे. यात शाळांमध्ये झालेली चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण, कथाकथन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ई-लार्ंनग साहित्याचा वापर, क्षेत्रभेटी, वेळापत्रक, मैदानी खेळ, आरोग्य तपासणी, दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा अशा तब्बल 128 मुद्दय़ांवरील माहिती व पह्टो अपलोड करण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे शाळांनी आपलेच मूल्यांकन करायचे आहे.
मुदतवाढ द्या
हे काम प्रचंड वेळखाऊ असल्याने परीक्षांच्या तोंडावर पूर्ण करता येणे शक्य नाही. म्हणून या कामाला मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे.
यंदाही तोच शिरस्ता
वार्षिक परीक्षा आल्या की पुठली ना पुठली कारपुनी कामे काढून शिक्षकांच्या माथी मारण्याचा शिरस्ता शालेय शिक्षण विभागाने यंदाही पाळला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या कामाने शिक्षकांना हैराण केले होते. त्यातच अध्ययन क्षमता वृद्धी प्रशिक्षण, मराठा सर्वेक्षण, परीक्षा पे चर्चा, ‘मुख्यमंत्री माझी शाळा’करिता माहिती भरण्याची सक्ती, निरक्षरांचे सर्वेक्षण इत्यादी कामांची टांगती तलवार शिक्षकांच्या माथी होती. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.