तीर्थक्षेत्रे – एक अवलोकन

>> डॉ. साहेबराव निगळ

तीर्थक्षेत्रात जाऊन पवित्र नदीत स्नान केल्याने बाह्य शरीर स्वच्छ होऊ शकते. त्यामुळे आंतरिक शुद्धी होत नाही, मन शुद्ध होत नाही. मी काशीला वा चारधामाला जाऊन आलो, गंगेत स्नान करून आलो अशी फुशारकी मात्र मारता येते. भोपळा गंगेत बुडविला किंवा साखरेच्या पाकात घोळला तरी तो आतून कडूच राहतो. मन शुद्धीसाठी दया, क्षमा, शांती हे सद्गुण विकसित केले पाहिजेत…

वाराणसीसारखी शहरे वा स्थाने व गंगा, गोदावरीसारख्या नद्यांना तीर्थस्थाने किंवा तीर्थक्षेत्र म्हणून मानलेले आहे. वरील नद्यांमध्ये स्नान करणे, वाराणसीसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देणे हे पापक्षालनाचे व पुण्यप्रद कार्य आहे, असे मानले जाते. ज्या गंगानदीचे पाणी अत्यंत शुद्ध मानले जात होते त्या गंगा नदीचे जल आज शुद्धीकरण मागते आहे. अशा अनेक नद्यांचे पाणी प्रदूषित झालेले आहे. या पवित्र जलप्रवाहाचे जल प्राशन करणे म्हणजे विविध रोगांना आमंत्रण देण्यासारखे झाले आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे.

तीर्थस्थानांविषयी, तेथील पंडय़ांविषयी, तेथील मंदिरातील पुजाऱयांविषयी कोणी चांगले बोलतो का? पत्रकारांनी, दूरदर्शनवाल्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन आलेल्या यात्रेकरूंच्या बोलभेटी घेतल्या तर कोणती उत्तरे मिळतील? अर्थात हा श्रद्धेचा विषय असल्यामुळे भाविक व श्रद्धाळू लोक स्पष्टपणे प्रतिक्रिया देतील याची खात्री नाही. सहज समाजातून गप्पागोष्टी करीत असताना त्यांच्या तीर्थक्षेत्रातील अनुभवाविषयी विचारणा केल्यास त्यांच्याकडून खरी उत्तरे, खरा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक महान वेदांताचार्यांचा अनुभवनिष्ठ अभिप्राय फार मोलाचा आहे. पुष्टी मार्गाचे प्रवर्तक व श्रीकृष्ण भक्त श्री वल्लभाचार्य आपल्या श्रीकृष्णाश्रय नावाच्या स्तोत्रात लिहितात ः गंगादि तीर्थक्षेत्रेषु दुष्टैरेवावृत्तेषुच। गंगा वगैरे तीर्थस्थानं ही दुष्टांनी भरलेली व घेरलेली आहेत. तीर्थस्थानांची ही परिस्थिती आज किती प्रमाणात बिघडलेली आहे हे सांगण्याची गरज नाही.

‘आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ हा ग्रंथ लिहिणारे, हिंदू धर्माच्या भवितव्याची चिंता करणारे विद्वान लेखक रा. ऋग्वेदी ऊर्फ वामन मंगेश दुभाषी लिहितात ः गंगा नदीत किंवा इतर नदीच्या पात्रात बुडी मारल्याने पापाचे परिमार्जन होते ही भावना अनर्थकारक आहे (प्रस्तुत ग्रंथ पान-111).

स्नानासारख्या पृत्रिम उपायांनी कधीही पापाचे क्षालन होणे शक्य नाही. भोपळा गंगेत बुडवून आणला तरी तो कडूच राहणार. त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण कडू अर्थात अन्याय आणि अत्याचार करणाऱयाने महातीर्थात जरी स्नान केले तरी ते कडू व पतीतच राहणार. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना तीर्थयात्रेला जाण्याविषयी विचारणा केली. श्रीकृष्णांनी त्याला कोणत्या नदीत स्नान केल्याने पापक्षालन होते याचा योग्य व सुंदर उपदेश खालील श्लोकात केला होता. श्रीकृष्ण म्हणाले :

आत्मानदी संयम पुण्यतीर्था।
सत्योदका शीलतटा दयोर्मिः।।
तत्राभिषेपं पुरु पाण्डुपुत्र।
न वारिणा शुद्ध्यति अन्तरात्मा।।

अर्जुना, आत्मा ही नदी आहे. मन संयमन हेच पुण्य देणारे या नदीच्या पात्रातील तीर्थ आहे. या नदीत सत्यरूपी उदक वाहते. सत् चारित्र्य किंवा शील नदीचे तट आहेत. तिच्याठायी निर्माण होणाऱया लाटा या दया, करुणारूपी आहेत. हे अर्जुना, या नदीत स्नान कर. केवळ पाण्याने स्नान केल्याने अंतरात्मा शुद्ध होत नाही. रा. ऋग्वेदी या श्लोकाचा अर्थ करताना लिहितात ः आत्मज्ञान, मनाचा संयम, सत्याचरण, वैश्विकदृष्टय़ा उच्चशील व भूतदयादी सद्गुण संवर्धन यांच्या योगाने मनुष्य पवित्र बनतो. सद्गुण संवर्धनासाठी सातत्यपूर्वक भगीरथ प्रयत्न करावे लागतात. पौराणिक कथेनुसार भगीरथाने गंगेला पृथ्वीतलावर आणण्यासाठी प्रचंड पुरुषार्थ केला. गंगा म्हणाली ः भगीरथा (राजपुत्रा), माझ्यात स्नान करून पापी लोक मला मलिन करतील त्याचे काय? भगीरथ म्हणाला ः माते, साधुसंत तुझ्यात स्नान करतील तेव्हा तू पवित्र होशील. खऱया संतांचा सहवास व त्यांचा सत्य धर्माचा संदेश, उपदेश आचरणात आणल्याने माणसाचे मन शुद्ध होते. हाच भगवान श्रीपृष्णांच्या अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा मथितार्थ आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यासंदर्भात म्हणतात ः साधूंची संगती हाच स्वर्गवास होय. साधूंची व्याख्याही तीर्थरूप तुकोबांनी केलेली आहे :

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।

अर्थात असे साधुसंत आजही अल्प प्रमाणात का होईना समाजात आहेत. ईश्वराचे नामस्मरण, कर्तव्यनिष्ठा व स्वसन्मानाबरोबर परसन्मान, सर्वभूतहितेरत यांसारखे सद्गुण संपादन करण्याचा सातत्यपूर्वक प्रयत्न करणे हे चित्तशुद्धीसाठी व स्वतःच्या आध्यात्मिक कार्यासाठी आणि समाजकार्यासाठी आवश्यक आहेत. त्यासाठी स्वतः विचार करणे, सद्ग्रंथ वाचन करणे, सत्संगतीत राहणे आवश्यक आहे.

चित्तशुद्धीच्या संदर्भात श्रेष्ठ संत तुकोबा लिहितात :

जाऊनिया तीर्था काय तुवा केले।
चर्म प्रक्षालिले वरी वरी।
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले।
भूषण त्वा केले आपणया।
वृंदावन फळ घोळीले साकरा।
भीतरील थारा मोडेचिना।
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया।
तो करी कासया फुंदा तुम्ही।

तीर्थक्षेत्रात जाऊन पवित्र नदीत स्नान केल्याने बाह्य शरीर स्वच्छ होऊ शकते. त्यामुळे आंतरिक शुद्धी होत नाही, मन शुद्ध होत नाही. मी काशीला वा चारधामाला जाऊन आलो, गंगेत स्नान करून आलो अशी फुशारकी मात्र मारता येते. भोपळा गंगेत बुडविला किंवा साखरेच्या पाकात घोळला तरी तो आतून कडूच राहतो. मन शुद्धीसाठी दया, क्षमा, शांती हे सद्गुण विकसित केले पाहिजेत.

संस्पृत सुभाषितकारही तीर्थाची फार व्यापक व्याख्या करतात व अनेक तीर्थे नमूद करताना लिहितात :

विद्यातीर्थे जगति विबुधाः साधवः सत्य तीर्थे।
गंगातीर्थे मलिन मनसो योगिनो ध्यानतीर्थे।
धारातीर्थे धरणिपतयः दानतीर्थे धनाढया।
लज्जातीर्थे पुलयुवतयः पातपं क्षालयन्ति।

सद्विद्या, सत्यनिष्ठा, ध्यान, दान, दुर्वतनाविषयी शरम वाटणे, ईशस्मरण यांच्यामुळे मलिन मन शुद्ध होते. गंगाप्रवाह म्हणजे आपल्यावर असलेल्या भगवंताचा प्रेमप्रवाह समजून घेणे व त्या परमेशाचे पृतज्ञतापूर्वक स्मरण करणे (भक्ती) होय. ‘गम्यते नाम प्राप्यते भगवद् पदं येन सा गंगा,’ असा अर्थ विद्वान करतात. तीच ईश भक्ती होय. अर्थात ईश्वराविषयी शुद्ध, अहेतुक प्रेम होय. भक्तीची व्याख्या करताना नारद लिहितात, भक्ती म्हणजे ईश्वराविषयीचे शुद्ध, निर्हेतुक प्रेम होय. अशी भक्ती आनंद स्वरूप असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात :

जे जे भेटे भूत। तेथे मानिजे भगवंत।
हा भक्ती योग। निश्चित जाण माझा।

सर्वांठायी ईश्वराची उपस्थिती स्वीकारून त्यांच्याविषयीसुद्धा आदरभाव ठेवणे ही भक्ती होय. या अर्थाने भक्ती हा एक दृष्टिकोन आहे, अभिवृत्ती आहे. या दृष्टीने विचार केल्यास भक्ती ही ज्ञानजन्य अभिवृत्ती आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ स्पिनोझाच्या भाषेत It is intellectual love towards God. हे प्रेम भौतिक अपेक्षारहित असते. अशा प्रेमात मागणे व रडणे नसते. ज्ञानदेव अशा भक्तीला अकृत्रिम भक्ती म्हणतात.