8 किमीचा प्रवास अन् केवळ 23 रुपये मिळाले, स्विगी डिलिव्हरी बॉयने मांडली व्यथा

कॉलेजची फी भरण्यासाठी काम करत असलेल्या दिल्लीतील स्विगी डिलिव्हरी बॉयने आपली व्यथा मांडून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. या वेळी त्याने ‘आस्क मी एनिथिंग’च्या माध्यमातून नेटकऱ्यांशी संवादही साधला. एका नेटकऱ्याने विद्यार्थ्याला मानधन आणि बरे-वाईट अनुभव विचारले. एका उत्तरात त्याने सांगितले की, पार्ट टाइम काम करून दरमहा सहा ते आठ हजार रुपये मिळतात. पण, 8 किमीचा प्रवास केल्यानंतर फक्त 23 रुपये मिळाल्याचा किस्सादेखील त्याने शेअर केला. कॉलेजची फी भरता यावी यासाठी रात्री स्विगीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.

8.4 किलोमीटरची पायपीट

दरम्यान, डिलिव्हरी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्याचे शोषण करतात असे वाटते का? या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यानुसार विद्यार्थ्याला 28 मिनिटांत 8.4 किलोमीटर एवढे अंतर गाठल्यानंतर बदल्यात फक्त 23 रुपये मिळाले. यामधील 10 रुपये प्रवासाचा खर्च आणि 13 रुपयांचा बोनस होता. ‘ऑर्डर देण्यास उशीर झाल्यामुळे एका ग्राहकाने मला मारण्याची धमकी दिली होती. रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क परिसरात जाताना वेळ लागतो. गुगल मॅप्सने दाखवलेले सर्व मार्ग बंद होते,’ अशी व्यथा त्याने मांडली.