उन्हाळ्यात दही गुलाबजलच्या फेसपॅकने मिळेल त्वचेला गारवा! त्वचेसाठी दही आहे खूप गरजेचे

उन्हाळा म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर लस्सी ही येणारच. लस्सी आणि उन्हाळा यांचं एक अनोखं समीकरण आहे. म्हणूनच उन्हाळा आणि गार पदार्थ यांची जोडी न तुटणारी आहे. याच उन्हाळ्यात मात्र आपल्या चेहऱ्याचे चांगलेच हाल होतात. उन्हाळ्यात आपण घरी गेल्यावर थंड वाटी दही खातो, हेच दही फेसपॅक म्हणून चेहऱ्यावर लावता येईल तर अधिक मज्जा येईल की नाही.. आज दह्याचा असाच फेसपॅक बघूया जो उन्हाळ्यातही गारेगार ठेवेल.
उन्हाळ्यात त्वचेसाठी दह्याचे महत्व खूप मोठे आहे. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड मुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. मृत त्वचा निघून गेल्यामुळे दह्यामुळे त्वचा चमकदार होते. त्यासोबतच दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी हे त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम मानले जाते. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम डार्क सर्कलसाठी अतिशय उपयोगी मानले जाते. मुख्य म्हणजे दह्यातील थंडाव्यामुळे उन्हामुळे भाजलेली त्वचा थंड राहण्यास मदत होते.
दह्याचे फेसपॅकमुळे चेहरा नितळ आणि तजेलदार होतो. तसेच स्किनवरील टॅनिंग सुद्धा निघण्यास मदत होते. चेहरा कोरडा पडल्यास दह्याचा फेसपॅक हा कायम एक उत्तम उपाय मानला जातो.
 
असा करा दह्याचा फेसपॅक
दही – 2 टेस्पून
बेसन- 2 टीस्पून
गुलाबजल – 1 टीस्पून
कृती- एका वाडग्यात दही, गुलाबजल आणि बेसन हे तीन घटक एकत्र करून पेस्ट बनवा.
आता ते चेहऱ्यावर लावा आणि किमान 30 मिनिटे राहू द्या.
काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा.
 
दह्याच्या या फेसपॅकमुळे काही वेळातच चेहरा तजेलदार दिसेल. तसेच दह्यामुळे त्वचेलाही चांगलाच थंडावा मिळतो. 
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)