एकनाथ शिंदे CM म्हणजेच करप्ट मंत्री! MMRDA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर फ्रान्सच्या कंपनीच्या आरोपांवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांच्या भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर आणले आहे. एमएमआरडीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर फ्रान्सच्या एका कंपनीने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे CM म्हणजे करप्ट मंत्री आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मिंध्यांच्या काळातले घोटाळे एकामागून एक बाहेर येत आहेत. या घोटाळ्यांविरोधात आम्ही 2022 पासूनच आवाज उठवत आलोय. हिंदुस्थान आणि फ्रान्स राजनैतिक दृष्ट्याजवळ येत असताना फ्रान्सच्या एका कंपनीने एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी मी याबद्दल बोललो आहे आणि आताही सांगतो, एकनाथ शिंदे सीएम म्हणजेच भ्रष्ट मंत्री आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे.

मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, या प्रकरणी पारदर्शक आणि निःपक्ष चौकशी करावी. फ्रान्सची कंपनी ही दशकभरापासून मुंबईत काम करते आहे. या कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि ते नाकारताही येणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे भ्रष्ट मंत्र्याच्या जवळचे कोण-कोण यात गुंतलेले आहेत त्या भ्रष्टाचाऱ्यांचे पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुंबई मेट्रोसाठी सिस्ट्रा कंपनी काम करते. इंजिनीअरिंग क्षेत्रातील फ्रान्सची ही बलाढ्य कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्याने पेमेंट देण्यास विलंब केला असून ते मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी कंपनीने थेट सरकारकडे तक्रार केली असून राजनैतिक हस्तक्षेपाचीही मागणी केली. कंपनीवर दबाव आणला जात आहे. मुख्य कर्मचाऱ्यांची मंजुरी थांबवून आणि मनमानी दंड आकारला जात आहे, असा आरोप सिस्ट्राने केला आहे. या प्रकरणी फ्रान्सच्या दुतावासाने दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांना 12 नोव्हेंबर 2024 ला पत्र लिहिले आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करून कंपनीची होत असलेली छळवणूक थांबवी, असे फ्रान्सच्या दुतावासाने म्हटले आहे. तर आपल्यापर्यंत कंपनीची तक्रार आलेली नाही. तरीही या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी बोलेन. प्रशासनात पारदर्शकता महत्त्वाची आहे. आणि आम्ही प्रशासनात ही पारदर्शकता निर्माण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.