
मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री उघडकीस आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर कणकवली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर असलेल्या घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्रीच या ठिकाणची फॉरेन्सिक तपासणी झाली होती. महामार्गापासून सुमारे 100 मीटर अंतरावर मृतदेह पेट्रोल वा डिझेल ओतून जाळण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर महिलेचा फक्त पाय शिल्लक असल्याचे समजते. ही महिला नेमकी कोण? तिची हत्या झाली की आत्महत्या आहे? हत्या असेल तर त्या मागचे कारण काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं काम पोलिसांकडे आहे.
घटनेबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे श्री. पाटील यांच्यासहित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.