उरणमध्ये मुंगसांच्या पलटणी, घरातून बाहेर पडल्यानंतर शुभशकुन; नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव

उरण शहर आणि परिसरात मुंगसांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसभर मुंगसांच्या या पलटणी रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात आणि येत असतात. त्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या उरणकरांना रस्त्यावर काही अंतर चालून गेल्यानंतर लगेच शुभशकुन घडत आहे. मुंगसाचे तोंड पाहणे शुभ मानले जात असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यांवर प्रसन्न भाव निर्माण होत आहेत.

हिंदू पौराणिक कथेनुसार मुंगसाचे संपत्ती आणि समृद्धीचे देव कुबेर यांच्याशी विशेष नाते आहे. मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना मुंगूस दिसणे शुभमानले जाते. मुंगूस दिसणे शुभ मानण्याची विविध कारणे सांगितली जात आहेत. घराभोवती मुंगसांचा नियमित वावर असेल तर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून विशेषतः सापांपासून संरक्षण मिळते. उरण परिसरातील विविध रस्ते ओलांडताना मुंगूसच मुंगूस दृष्टीस पडू लागले आहेत. अधूनमधून एक -दोन तर कधी आपल्या चार-सहा पिल्लाच्या परिवारासह रस्ते ओलांडताना दिसणे आता वाटसरूंना नेहमीचे झाले असल्याची माहिती कामगार प्रताप रणपिसे यांनी दिली आहे.

उरणमध्ये मुंगसाच्या नऊ प्रजाती

राखाडी मुंगूस, बटू मुंगूस, बँडेड मुंगूस, छोट्या शेपटीचे मुंगूस, करडे मुंगूस, तपकिरी मुंगूस, आशियाई छोटे मुंगूस, इजिप्ती मुंगूस, खेकडा खाऊ मुंगूस आदी नऊ प्रजातींतील मुंगूस उरण परिसरात आढळून येत आहेत. जंगलातच नव्हे तर उरण परिसरातील बहुतांश रस्त्यांवरून मुंगसांची पलटण रस्ता ओलांडताना, झाडाझुडपांमध्ये हिंडताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.