
वेणगावात मानवी शरीराचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्जतकर हादरले असून परिसरात एकच खळबळ उडाली. कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मानवी तुकडे ताब्यात घेतले. या व्यक्तीचा मृत्यू महिन्याभरापूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा मृतदेह कोणाचा, हत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत.
कर्जतच्या वेणगाव येथील पराडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्जनस्थळी मानवी शरीराचे तुकडे सापडले. याठिकाणी गावकरी गेले असता त्यांना हे तुकडे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती कर्जत पोलिसांना दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास केला असता परिसरातील कोणीही बेपत्ता नसल्याचे समोर आले. दरम्यान कुजलेल्या अवस्थेत सापडून आलेले मानवी तुकडे फॉरेन्सिक लॅब, मुंबई येथे पाठवण्यात आले असून याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.