
भात खरेदी केंद्रावर भात देऊन दोन महिने उलटले असले तरी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड रखडली आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि सरकारच्या या तुघलकी कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात गोहे, पोशेरी, कोनसई, परळी, सारशी, खैरे- आंबिवली, मानिवली, गुहिर या आठ केंद्रांचा समावेश आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी-विक्री केंद्रांवर घेण्यात आले आहेत. ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत त्यांचे भात घेतलेले नाही. भात विक्री होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे तरी भात विक्रीचे पैसे दिलेले नाहीत. भाताचे पैसे लवकर मिळावेत यासाठी अनेक शेतकरी महामंडळाच्या कार्यालयात दररोज फेऱ्या मारीत आहेत. अधिकारी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पुन्हा माघारी पाठवत आहेत.
■ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे करोडोंच्या घरात शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याने येथील शेतकरी संकटात सापडले आहेत. सेवा सहकारी सोसाट्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
■ सध्या लग्नसराई सुरू आहे. मुलाबाळांची लग्नं येऊ घातली आहेत. ही लग्नं उरकणार कशी, असा मोठा आर्थिक पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
■ केंद्रचालकांकडे यासंदर्भात चौकशी केली असता काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सर्वच कागदपत्रांची खातरजमा करून घेतली असता तांत्रिक अडचण तरी कोणती, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
■ लवकरात लवकर भात विक्रीचे पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी मात्र सध्या फक्त उडवाउडवीच्या उत्तरात व्यस्त आहेत.