
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने भाविकांना नाइलाजास्तव उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश प्रदुषण कंट्रोल बोर्डाला याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्याच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणी बारकाईने तपासणी करावी असेही आदेश हरित लवादाने दिले आहेत. तसेच या प्रकरणी ज्या भाविकाने हरित लवादाकडे याचिका केली होती त्याच्याकडील सर्व पुरावे प्रदुषण कंट्रोल बोर्डाला देण्यास सांगितले आहे.
महाकुंभमेळय़ात 45 कोटी भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती संख्या आता सरकारच्या आकडेवारीनुसार 60 कोटींच्या घरात पोहोचली आहे. राष्ट्रीय हरित लवादाला देण्यात आलेल्या अर्जाच्या माध्यमातून उघडय़ावर शौच करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानवी मलमूत्र विल्हेवाटासाठी अनेक अत्याधुनिक सुविधांची सोय करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र भाविकांची संख्या वाढल्याने बायोटॉयलेट्सची कमतरता आणि व्यवस्थित देखभाल नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव भाविकांना उघडय़ावर शौचास बसावे लागते. भाविक गंगा नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसत असल्याने पाणी दूषित झाले असून मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
जर अर्जदाराने केलेले आरोप खरे ठरले तर उत्तर प्रदेश प्रदुषण कंट्रोल बोर्डाच्या सचिवांनी यावर तत्काळ कारवाई करून आपण काय कारवाई केली याचा अहवाल चार आठड्याच्या आत लवादाकडे सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.