
माणिकराव कोकाटे यांना हे माहीत नसेल की, मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. मंत्र्यांनी त्यासाठी फक्त नावांचा प्रस्ताव पाठवायचा असतो. त्यासाठी 125 जणांच्या नावांची यादी आतापर्यंत आली आहे. त्यातील 109 जणांच्या नावाला मी मंजुरी दिली. फिक्सर असलेले लोक मंत्रालयात नको म्हणून उर्वरित 16 नावांना मान्यता दिली नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले होते, तुम्हाला पाहिजेत ती नावे पाठवा, पण फिक्सर म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या नावांना मान्यता देणार नाही. त्यानुसार माझ्याकडे 125 च्या जवळपास नावे आली आहेत. त्यातील मी 109 नावे क्लिअर केली आहेत. राहिलेली नावे मी क्लिअर केलेली नाहीत. कारण कोणता न कोणता आरोप त्यांच्यावर आहे. तसेच कोणती न कोणती चौकशी त्यांच्यावर सुरू आहे. त्यामुळे कोणी नाराज झाले तरीही मी अशा नावांना मान्यता देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.