
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे, खोटे आणि तथ्यहीन आरोप करणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवाजी नगर जिल्हा न्यायालयात एक रुपयाचा मानहाणीचा व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.
गोऱ्हे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. याबाबत मुळशी तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी सहसंपर्प संघटक स्वाती ढमाले, मुळशी तालुका संघटक वृंदा येनपुरे, मंजश्री ढमाले, राणी शिंदे, संतोषी मारणे, सुमन जोरी, सहकार सेनेचे ज्ञानेश्वर डफळ आदी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे आणि संदर्भ नसलेले आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. असे खोटे आरोप करणाऱ्या गोऱ्हे यांच्यावर शिवसेना महिला आघाडीतर्फे न्यायालयात एक रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच गोऱ्हे यांच्या वक्तव्याची शासनाने दखल घेऊन तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पुणे जिह्यात महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
नीलम गोऱ्हे यांच्या रक्तात इमानदारी नाही – अंधारे
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या रक्तात इमानदारी नसल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. ज्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या. गोऱ्हे यांनी यामध्ये एकनाथ शिंदे यांचेही नाव घेतले. त्यामुळे शिंदे यांनी ते कलेक्शन करत होते का ते सांगावे, असे आव्हान देऊन अंधारे म्हणाल्या, सध्या गोऱ्हे यांच्यावर टीका होत आहे. मात्र यापेक्षाही वाईट शब्द गोपीनाथ पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरले होते तेव्हा भाजपचे लोक फिदीफिदी हसत होते, त्यांचे काय करायचे ते आधी सांगा. गोऱ्हे या शिवसेनेचे देणे लागतात, असा समाचार अंधारे यांनी घेतला.