ट्रम्प यांनी 2 हजार यूएसएआयडीच्या कर्मचाऱ्यांना काढले, संस्थेने हिंदुस्थानसाठी मंजूर केले होते 182 कोटी

डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी अर्थात अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या तब्बल 2 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याची घोषणा केली. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. यूएसएआयडीने हिंदुस्थानात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 21 मिलियन डॉलर अर्थात 192 कोटी रुपये आर्थिक मदत मंजूर केली होती. ही संस्था आता केवळ काही नेते आणि गरजेचे असलेले कर्मचारीच संस्थेत ठेवेल असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

दहा दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांच्या डॉजने हिंदुस्थानला आणि जगभरात अनेक देशांना देण्यात येणारे निधी रोखले होते. हिंदुस्थानी अर्थमंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार 2023-24 दरम्यान यूएसएआयडीने सात प्रकल्पांना 6,505 कोटी रुपयांचा निधी दिला होता. एका संघीय न्यायाधीशाने प्रशासनाला यूएसएआयडी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी कामगारांना घरी पाठवण्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारच्या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती कामगारांनी केली, परंतु न्यायाधीश कार्ल निकोल्स यांनी ती फेटाळून लावली.

कामगारांची लाय डिटेक्टर चाचणी करणार

सरकारच्या गोपनीय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा त्या केल्या असतील या संशयातून ट्रम्प सरकार लाखो कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी करणार आहे. अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. सरकारी गोपनीय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.