
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय यांना दिलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला अपिलाचा निर्णय लागेपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती अॅड. अविनाश भिडे यांनी दिली.
मुख्यमंत्री कोटय़ातील सदनिका घेताना कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात अपिल केले आहे, त्यावर सोमवारी सुनावणी झाली. अपिलाची सुनावणी होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोकाटे बंधूंना प्रत्येकी एक लाखाचा जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी दिली.
अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी
न्यायालयाने दिलेल्या शिक्षेप्रकरणी कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवू नये यासाठी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडण्यात येणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.