
मुलुंडमधील घर खरेदीदाराची कांजूरमार्ग येथील विकासकाकडे अडकून पडलेली 42 लाखांपैकी 37 लाखांची रक्कम परत मिळवून देण्यात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाला मोठे यश मिळाले आहे. बुक करण्यात आलेले घर आजारपण तसेच इतर कारणांमुळे घेऊ शकत नसल्याचे ग्राहकाने पुराव्यानिशी दाखवून दिल्यानंतरही विकासक पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता. याबाबत लिखित तक्रार मिळाल्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विकासकाला दणका देत ग्राहकाला त्याची हक्काची रक्कम परत मिळवून दिली.
मुलुंड येथे राहणाऱ्या संबोधन धम्मपत्ती यांनी कांजूरमार्ग पूर्व येथील रुणवाल ग्रुपच्या 2 बीएचके सदनिकेचे 2016 मध्ये बुकिंग केले होते. त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने 2020 पर्यंत एकूण 42 लाख रुपये भरले. त्यानंतर 2020 ते 2022 सालात कोरोना काळ असल्याने आणि स्वतः धम्मपत्ती यांच्या आजारी असल्याने त्यांनी घराचे बुकिंग रद्द करण्यासाठी रुणवाल ग्रुप यांच्याकडे ई-मेल आणि प्रत्यक्ष भेटून अर्ज दिला होता. त्याचा पाठपुरावाही केला होता, पण रुणवाल ग्रुपकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा धम्मपती यांनी शिवसेना भवन दादर येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष येथे संपर्क साधून रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या सूचनेने व कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तक्रार उत्तर पूर्व मुंबई कक्षाचे समन्वयक अजय शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. शिरोडकर आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुहास राऊत, मुलुंड कक्ष विधानसभा संघटक प्रकाश सावंत व कक्ष उपसंघटक नितीन भोसले यांनी तक्रारदारांच्या सोबत रुणवाल ग्रुप कार्यालयात वेळोवेळी जाऊन संवाद साधून व पाठपुरावा करून गुंतवणूक केलेल्या 42 लाखांपैकी संबोधन धम्मपत्ती यांना 37 लाखांचा धनादेश मिळवून दिला. त्याबद्दल संबोधन धम्मपत्ती यांनी शिवसेना आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे आभार मानून तसे आभारपत्र महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सचिव निखिल सावंत व कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले.