पेपरफुटी झालेल्या एजन्सीलाच पालिका भरतीचे काम देऊ नका! युवा सेनेचे आझाद मैदानात जोरदार आंदोलन

मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, उपअधियंता पदांसाठी होत असलेल्या भरतीमध्ये पेपरफुटी झालेल्याच कंपनीलाच भरती प्रक्रिया राबवण्याचे काम देण्यात आले आहे. याचा निषेध करीत भरती प्रक्रिया अधिकृत आणि निःपक्षपातीपणे घ्यावी, अशी मागणी करीत युवा सेनेकडून आझाद मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अर्ज केले  आहेत. त्यामुळे ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. मात्र याआधी पेपर फुटी होणाऱ्या पंपनीलाच आता काम देण्यात आल्याने एकूणच भरती प्रक्रियेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार युवा सेनेकडून आज आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. भरतीसाठी नेमलेल्या पंपनीच्या कामाबाबत गोंधळ होण्याचा धोका असल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेत गोंधळ होऊ शकतो. याचा फटका शेकडो उमेदवारांच्या मेहनतीला बसणार आहे. त्यामुळे पालिकेने ही भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अभिषेक शिर्पे, सिद्धेश धाऊस्कर, अश्विनी पवार, धनश्री कोलगे, सिद्धेश शिंदे, जय सरपोतदार व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.