कर्नाटकच्या बसची थेट मुंबई सेंट्रलपर्यंत सेवा सुरूच! मराठी जनतेचा स्वाभिमान दुखावूनही कन्नडिगांना महायुतीकडून पायघड्या

महाराष्ट्रातील एसटी बसचालकांशी मुजोरीने वागणाऱ्या, कन्नडिगांच्या बसचा मुक्तसंचार रोखण्यात महायुती सरकार सोमवारीही असमर्थ ठरले. सीमावर्ती भागात मुक्तपणे धावणाऱ्या कर्नाटकच्या बसेस सोमवारी थेट मुंबई सेंट्रलपर्यंत पोहोचल्या. सरकारने कर्नाटकच्या बसना प्रवेशबंदी लागू करण्यासंबंधी लेखी सूचना वा आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे महायुतीला मराठी अस्मितेशी देणेघेणे आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

कन्नड न बोलणाऱ्या महाराष्ट्रातील बसचालकांशी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली आणि तोंडाला काळे फसले. या घटनेनंतर मराठी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.  कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कन्नाडिगांविरोधात जोरदार निदर्शने केली. कर्नाटकच्या बस अडवल्या. त्यानंतर महायुती सरकारला जाग आली व महाराष्ट्रातील एसटीची कर्नाटकातील सेवा बंद केली आहे. याच वेळी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्यात येऊ देणार नसल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तशी पुठलीही लेखी सूचना वा आदेश काढलेले नाहीत.

मुंबई सेंट्रल आगारातील अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस सोमवारी सकाळी आमच्या आगारात दाखल झाल्या होत्या. राणीबेनूर ते मुंबई सेंट्रल, बेळगाव ते मुंबई सेंट्रल आणि बेंगलोर ते मुंबई सेंट्रल या कर्नाटकच्या बस सायंकाळी कर्नाटकच्या दिशेने रवाना झाल्या. आम्हाला कर्नाटकच्या बसना प्रवेशबंदीबाबत पुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्या बसेसना पुठल्याही प्रकारे अटकाव केला नाही, असे मुंबई सेंट्रल आगारातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.