फिल्मसिटी आग प्रकरणातील दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत करा! शिवसेनेची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणी

गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी)मधील नागरमोडी आदिवासी पाडामध्ये लागलेल्या आगीत सुमारे 100 झोपड्या आणि गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात गरीबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूही शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या दुर्घटनाग्रस्तांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जोगेश्वरीचे आमदार बाळा नर यांनी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी)च्या प्रवेशद्वारसमोर मोठ्या प्रमाणात झोपडय़ा आणि चित्रीकरणाचे सामान ठेवण्यासाठी असलेली गोदामे होती. 20 फेब्रुवारीला लागलेल्या आगीत या झोपडय़ा आणि गोदामांचे मोठे नुकसान झाले. रहिवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. त्यांच्याकडे कपडेलत्ते, अन्नधान्य अशा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत. या झोपडय़ांमधील राहणारे रहिवासी अत्यंत गरीब असल्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार बाळा नर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.